धारावीत व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या

धारावीत व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या

Published on

धारावीत व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या
करणी करत असल्याच्या संशयातून कृत्य

मुंबई, ता. १५ : धारावी कोळीवाड्यात राहणाऱ्या ५८ वर्षीय भंगार व्यावसायिकाने पत्नीची हत्या केली. हत्येनंतर मुलाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून आईची हत्या केल्याचे त्याने सांगितले, तेव्हा या गुन्ह्याला वाचा फुटली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३) हा धक्कादायक प्रकार घडला. अमृत सोळंकी असे व्यावसायिकाचे नाव आहे. पत्नी आणि मुले आपल्यावर करणी करतात, असा संशय अमृत यांना होता. या समस्यांमुळे ते अस्वस्थ होते, याच संशयातून त्यांनी पत्नीची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. अमृत आणि मृत सूरजबेन धारावीत राहत होते. तर त्यांची चार मुले मुलुंड आणि ठाणे येथे वास्तव्यास आहेत. गेल्या तीन वर्षांपासून अमृत पत्नी आणि मुलांवर संशय घेत होता, त्यातून कुटुंबात सतत वाद होत असे. अमृत यांनी मुलांना घरी येण्यास मनाई केली होती. बुधवारी (ता. ११) मुलगा शिवराम आई-वडिलांना भेटण्यासाठी धारावी येथे गेला होता. वडील दिवसभर चिडचिड करत आहेत, वाद घालत आहेत, असे आईने त्याला सांगितले. समजावण्यासाठी गेलेल्या शिवरामसोबतही अमृत यांनी वाद घातला आणि एक दिवस तुम्हा सगळ्यांची हत्या करीन, अशी धमकी दिली. दोन दिवसांनी पुन्हा काही निमित्ताने शिवराम घरी गेला; मात्र वडील घरात असूनही दार उघडत नव्हते. त्यांनी घरातूनच व्हिडिओ कॉल करून आईची हत्या केल्याचे त्याला सांगितले. वडील रक्ताने माखलेले तर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्याने पाहताच पोलिसांना कळवले. अमृत यांनी गळा आवळून आणि अवजड वस्तूचे डोक्यात घाव घालून पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com