गोराई डंपिंग ग्राउंडच्या सुरक्षेसाठी पालिकेची कंबर कसली

गोराई डंपिंग ग्राउंडच्या सुरक्षेसाठी पालिकेची कंबर कसली

Published on

गोराई डम्पिंग ग्राउंडच्या
सुरक्षेसाठी पालिकेची कंबर कसली
दोन वर्षांच्या देखभालीसाठी निविदा; ९.१० कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : गोराई येथील शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आलेल्या डम्पिंग ग्राउंडच्या देखभाल व संचालनासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. पुढील दोन वर्षांसाठी या प्रकल्पाच्या देखभालीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासाठी सुमारे नऊ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. इच्छुक कंत्राटदारांना १ एप्रिलपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.
मुंबईतील कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून २००९-१० मध्ये गोराई डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आले. सुमारे १९ हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या या डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे ढिगारे हटवून तेथे हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे. मात्र, जमिनीखालील कचऱ्यातून सतत निर्माण होणारे घातक वायू आणि दूषित पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित तांत्रिक देखभाल करणे आवश्यक आहे.
या देखभालीच्या कामामध्ये लँडफिल गॅस कलेक्शन सिस्टीमचे संचालन, दूषित पाणी प्रक्रिया केंद्राची देखभाल, तसेच संपूर्ण परिसराचे व्यवस्थापन व सुरक्षा यांचा समावेश आहे. या कामासाठी दोन वर्षांच्या कालावधीची निविदा काढण्यात आली असून, १८ मार्च रोजी ‘प्री-बीड’ बैठक होणार आहे. गोराई प्रकल्प हा देशातील असा पहिला प्रकल्प होता, ज्यामध्ये कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे संकलन करून त्यातून ‘कार्बन क्रेडिट्स’ मिळवण्यात आले होते. यामुळे महापालिकेला सुरुवातीच्या काळात कोट्यवधी रुपयांचा महसूलही मिळाला होता. तसेच मिथेन वायूचे उत्सर्जन नियंत्रित केल्यामुळे परिसरातील आगीचे धोकेही टळले आहेत.

जलप्रदूषण होण्याचा धोका
डम्पिंग ग्राउंडची योग्य देखभाल झाली नाही, तर जमिनीखालून झिरपणारे दूषित पाणी गोराई खाडीत जाऊन जलप्रदूषण होण्याचा धोका आहे. त्यामुळे गोराई व कांदिवली परिसराचे संरक्षण करण्यासाठी ही निविदा महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, मुंबईतील देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडदेखील शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची प्रक्रिया सध्या प्रगत टप्प्यात आहे. त्यामुळे गोराई प्रकल्पाचा ‘मेंटेनन्स मॉडेल’ आणि त्यावर होणारा खर्च आगामी प्रकल्पांसाठी महापालिकेसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com