वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडवा!
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडवा!
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत ‘महाराष्ट्र सीनियर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन’ने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांकडे निवेदन सादर केले. स्टायपेंडचे अनियमित वितरण, सुधारित महागाई भत्ता न मिळणे, एकसमान रजा धोरणाचा अभाव तसेच बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीतील तांत्रिक अडचणींबाबत संघटनेने चिंता व्यक्त केली.
पाचव्या वेतन आयोगानुसार, महागाई भत्ता ४६६ टक्क्यांवरून ४७४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा शासन निर्णय झालेला आहे, तरीही अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अद्याप सुधारित महागाई भत्ता दिला जात नाही. तसेच सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुधारित स्टायपेंडची एकसमान अंमलबजावणी करावी आणि प्रलंबित थकबाकी तत्काळ मंजूर करावी. याशिवाय वरिष्ठ निवासी डॉक्टरांबाबत निश्चित रजा धोरण नसल्याची बाबही संघटनेने अधोरेखित केली. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दरवर्षी किमान १२ नैमित्तिक आणि २० विशेष रजा देण्यात याव्या. तसेच बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीतील तांत्रिक बिघाडांमुळे प्रत्यक्ष उपस्थित असतानाही डॉक्टरांवर अनुपस्थितीची कारवाई होत असल्याबाबत असोसिएशनने चिंता व्यक्त केली. विभागप्रमुखांकडून उपस्थितीची खातरजमा असूनही डॉक्टरांना त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या सर्व मुद्द्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने राज्यभर स्पष्ट निर्देश जारी करावेत. महाराष्ट्रातील आरोग्यसेवेचा कणा असलेल्या वरिष्ठ निवासी डॉक्टरांना प्रशासकीय पाठबळ मिळणे अत्यावश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

