सैनिकी विद्यार्थ्यांचा भत्ता ५० हजारांपर्यंत वाढवणार?
सैनिकी विद्यार्थ्यांचा भत्ता ५० हजारांपर्यंत वाढवणार?
मुंबई, ता. १८ : ‘राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता दिला जाणारा भत्ता १५ हजार रुपयांवरून ५० हजारांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे,’ अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला. मंत्री शिरसाट म्हणाले, की सैनिकी शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निर्वाह भत्त्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. यासंदर्भात समितीचा अहवाल प्रलंबित असून, तो प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. २०२५-२६ या वर्षासाठी या योजनेसाठी सात काेटी १५ लाखांची तरतूद करण्यात आली असून, पात्र विद्यार्थ्यांना लाभ दिला जात आहे.
राज्यातील काही शाळांकडून प्रस्ताव प्रलंबित असून, काही ठिकाणी भत्त्याचे वितरण पूर्ण झाले आहे. भत्तावाढीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी संबंधित संस्थांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

