स्थलांतरित पक्ष्यांच्या संरक्षणासाठी '' बीएनएचएस'' आणि ''बर्डलाईफ इंटरनॅशनल'' एकत्र
स्थलांतरित पक्ष्यांच्या संरक्षणासाठी विशेष कार्यशाळा
विविध देशातील अनेक प्रतिनिधींचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मध्य आशियाई उड्डाण मार्ग (सेंट्रल एशिया फ्लायवे - सी.ए.एफ.) क्षेत्रातील स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी ‘बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटी’ (बी.एन.एच.एस.) आणि ‘बर्ड लाइफ इंटरनॅशनल’ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे पाचदिवसीय विशेष कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत १३ देशांतील ४५ हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मध्य आशियाई उड्डाण मार्गावरील सहभागी देशांच्या स्वयंसेवी संस्थांची क्षमता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. यामध्ये पक्ष्यांच्या अधिवासातून मिळणाऱ्या परिसंस्था सेवांचे मूल्यांकन करणे, निसर्गावर आधारित उपायांद्वारे स्थळांचे व्यवस्थापन करणे, पक्षी-अनुकूल ऊर्जा पायाभूत सुविधांची निर्मिती आणि शिकारीचे प्रमाण कमी करण्यासाठी वन्यजीव कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे या विषयांवर सखोल चर्चा व प्रशिक्षण दिले गेले.
या वेळी राजीव मित्तल (महासंचालक, राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन) यांनी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत पक्षी प्रजातींच्या संरक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. प्रवीण परदेशी (मुख्य आर्थिक सल्लागार, महाराष्ट्र मुख्यमंत्री) यांनी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या विशेष उपक्रमांबाबत प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच किशोर रिठे (संचालक, बीएनएचएस) यांनी बीएनएचएसने गेल्या १४२ वर्षांत भारतात केलेल्या पक्षी स्थलांतर अभ्यासाचा आढावा मांडला, तर विनायगन धर्मराजा (प्रादेशिक संचालक, बर्ड लाइफ एशिया) यांनी या कार्यशाळेमुळे मालदीवपासून सायबेरियापर्यंत पसरलेल्या ३० देशांमध्ये सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनात भारत सध्या जागतिक नेतृत्व करत आहे. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या ‘सीएमएस सीओपी-१४’ परिषदेत भारताने ‘सेंट्रल एशियन फ्लायवे इनिशिएटिव्ह’ मांडले होते. या नेतृत्वामुळे भारताला ‘चॅम्पियन प्लस’ या बहुमानाने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यशाळेमुळे भारतासह इतर १३ देशांमधील संस्थांना एकमेकांचे यशस्वी प्रयोग जाणून घेता येतील, ज्यामुळे भविष्यात स्थलांतरित पक्ष्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
...........
कार्यशाळेतून हे साध्य झाले
१. अधिवास संरक्षण : पक्ष्यांच्या अधिवासांमुळे स्थानिक समुदायांना मिळणारा रोजगार आणि पूर-दुष्काळासारख्या आपत्ती निवारणात होणारी मदत समजून घेणे.
२. शाश्वत व्यवस्थापन : पाणथळ जागांचे पुनरुज्जीवन करून अन्नसुरक्षा आणि जैवविविधतेचा समतोल राखणे.
३. पक्षी-सुरक्षित ऊर्जा : वीज प्रकल्प किंवा पायाभूत सुविधा उभारताना त्या पक्ष्यांसाठी घातक ठरणार नाहीत, याची काळजी घेणे.
४. शिकारीवर नियंत्रण : अवैध पक्षी शिकार रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांना तांत्रिक सहकार्य करणे.
५. टॅगिंग तंत्रज्ञान : टॅगिंगच्या माध्यमातून पक्ष्यांचा प्रवास आणि त्यांच्या मार्गातील धोके ओळखणे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

