सिद्धार्थ विधी महाविद्यालयात जादा शुल्क?
सिद्धार्थ विधी महाविद्यालयात जादा शुल्क?
प्रभारी प्राचार्यांविरुद्ध विद्यापीठाकडे लेखी तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : फोर्ट येथील ऐतिहासिक सिद्धार्थ विधी महाविद्यालयात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी यांनी नियमापेक्षा जास्त शुल्क आणि काही विद्यार्थ्यांकडून दुबार शुल्क घेतल्याची तक्रार विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.
एलएलबी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी वैभव गायकवाड याने यासंदर्भात विद्यापीठाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या शुल्क संरचनेचे उल्लंघन करून जास्तीची रक्कम वसूल केली जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे. २०२१मध्येही अशाच प्रकारचे आरोप झाले होते; मात्र त्या वेळीही दोषींवर कारवाई न झाल्याने आता त्याची पुनरावृत्ती होत असल्याची भावना विद्यार्थ्यांत आहे.
डॉ. सुधाकर रेड्डी यांना मुंबई विद्यापीठाने अधिकृत मान्यता दिली असल्याने त्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे ही विद्यापीठाचीच जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. जादा आकारलेले शुल्क तत्काळ परत करावे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कारवाई न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचा रोष आणि प्रशासनाचा दावा यांच्यातील या वादामुळे मुंबई विद्यापीठ यावर काय अंतिम निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...........
तक्रारी वैयक्तिक आकसातून : रेड्डी
आरोपांबाबत सिद्धार्थ विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी यांनी आपली बाजू मांडली आहे. रेड्डी म्हणाले, की या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर आम्ही आमचे सविस्तर स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाकडे सादर केले आहे. ओळखपत्र, वाचनालय यासाठी काही विद्यार्थ्यांचे शुल्क तांत्रिक कारणास्तव किंवा गैरसमजातून दुबार घेण्यात आले होते. ते आम्ही संबंधितांना परतही केले आहे. आता हे प्रकरण मिटले असताना काही विद्यार्थी वैयक्तिक आकसातून जाणीवपूर्वक तक्रारी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

