भारतीय नौदलात ‘तारागिरी’ची भर; ३ एप्रिलला अत्याधुनिक स्टेल्थ युद्धनौका सेवेत

भारतीय नौदलात ‘तारागिरी’ची भर; ३ एप्रिलला अत्याधुनिक स्टेल्थ युद्धनौका सेवेत

Published on

नौदलात ‘तारागिरी’ची भर
३ एप्रिलला अत्याधुनिक स्टेल्थ युद्धनौका सेवेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : भारतीय नौदलाच्या ताकदीत आणखी एक अत्याधुनिक भर पडणार असून, ‘तारागिरी’ (एफ-४१) ही स्टेल्थ युद्धनौका ३ एप्रिल २०२६ ला विशाखापट्टणम येथे नौदलात दाखल होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणारा हा समारंभ देशाच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रोजेक्ट १७-ए अंतर्गत तयार झालेली ‘तारागिरी’ ही या मालिकेतील चौथी अत्याधुनिक युद्धनौका आहे. सुमारे ६,६७० टन वजनाची ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रसज्जतेसह तयार करण्यात आली आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचे ती प्रभावी उदाहरण ठरली आहे.
मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे तयार करण्यात आलेल्या या युद्धनौकेमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे देशातील २०० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना काम मिळाले असून, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळाली आहे.‘तारागिरी’ची रचना अत्यंत आधुनिक असून, तिचे रडार प्रतिबिंब कमी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शत्रूच्या रडारला चकवा देत गुप्तपणे कारवाई करण्याची क्षमता या युद्धनौकेला प्राप्त झाली आहे.


उच्च वेगासह प्रगत शस्त्रसज्जता
या युद्धनौकेत डिझेल आणि गॅसवर चालणारी प्रगत इंजिन प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे उच्च वेगासह दीर्घकाळ समुद्रात कार्यरत राहण्याची क्षमता मिळते. तसेच सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आणि पाणबुडीविरोधी अत्याधुनिक शस्त्रसज्जतेमुळे ही युद्धनौका बहुआयामी लढाईसाठी सक्षम ठरते. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जलद प्रतिसाद क्षमता अत्याधुनिक कॉम्बॅट मॅनेजमेंट प्रणालीमुळे सर्व शस्त्र आणि सेन्सर यंत्रणा एकत्रितपणे कार्य करत कोणत्याही धोक्याला वेगाने प्रतिसाद देऊ शकतात.

आपत्ती मदतीसाठी सक्षम
लढाऊ मोहिमांबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, मानवतावादी सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्य मोहिमांसाठीही ‘तारागिरी’ उपयुक्त ठरणार आहे. या युद्धनौकेच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार असून स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेलाही मोठे बळ मिळणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com