(मुंबई टुडे साठी)मुंबई विद्यापीठात गार्डनिंग व लँडस्केपिंग प्रात्यक्षिक क्षेत्राचे उद्घाटन

(मुंबई टुडे साठी)मुंबई विद्यापीठात गार्डनिंग व लँडस्केपिंग प्रात्यक्षिक क्षेत्राचे उद्घाटन

Published on

विद्यापीठात बागकाम व लँडस्केपिंग प्रात्यक्षिक क्षेत्राचे उद्‍घाटन

मुंबई, ता. २१ : विद्यार्थ्यांना बागकाम आणि लँडस्केपिंगच्या आधुनिक तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळावे तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच कौशल्य विकासालाही चालना मिळावी, यासाठी मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण केंद्रासाठी विकसित करण्यात येत असलेल्या बागकाम व लँडस्केपिंगच्या प्रात्यक्षिक क्षेत्राचे उद्‍घाटन कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रात्यक्षिक क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बागकाम व लँडस्केपिंगचे केवळ सैद्धांतिक नव्हे, तर प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोपोनिक्स, घराच्या छतावरील बागकाम आणि शहरी शेती यासारख्या नव्या पद्धतींचे प्रात्यक्षिक करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास होऊन रोजगारक्षमतेत वाढ होईल तसेच विविध वनस्पती, सेंद्रिय खत व कीड नियंत्रण पद्धतींवर संशोधन व प्रयोग करण्याची संधी उपलब्ध होईल. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून, किचन गार्डन, नर्सरी आणि लँडस्केपिंगसारख्या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. परिणामी, हा प्रात्यक्षिक भूखंड शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि हरित कॅम्पस उभारणीचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरणार आहे.
या वेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या विविध पर्यावरणपूरक प्रकल्पांची माहिती दिली. जलसंधारण, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प तसेच सौरऊर्जा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठ ‘ग्रीन कॅम्पस’च्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी अशा प्रायोगिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगत, भविष्यात बहिशाल विभागासाठी अधिक जागा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. नुकतेच मुंबई विद्यापीठाचे बहिशाल शिक्षण केंद्र आणि द नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट गार्डनिंग, सीझन ३- गार्डनिंग अँड लँडस्केप’ या दोनदिवसीय कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी भाभा अणुसंशोधन केंद्राचे बायोसायन्स ग्रुपचे सहयोगी संचालक डॉ. पी. ए. हसन, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. चंद्रकांत साळुंखे आणि द नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्रीजचे अध्यक्ष डॉ. ए. डी. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्‍घाटनपर भाषणात डॉ. हसन यांनी बागकामाचा संबंध स्वच्छता अभियानाशी जोडत, सुंदर बागा निर्माण झाल्यास परिसरात कचरा टाकण्याची प्रवृत्ती कमी होत असून पर्यावरण आपोआप स्वच्छ व आकर्षक बनत असल्याचे त्यांनी सांगितले. बीएआरसी आणि मुंबई विद्यापीठ यांच्यातील सहकार्याचा उल्लेख करत त्यांनी भविष्यातही संयुक्त उपक्रम राबविण्याची तयारी दर्शवली. उच्च उत्पादनक्षम पिकांच्या वाणांच्या प्रसारासाठी विभागासोबत संयुक्त संशोधन उपक्रम हाती घेता येतील, असेही त्यांनी सांगितले.
या दोनदिवसीय कार्यशाळेत हायड्रोपोनिक्स, छतावरील बांधकाम, बांबू शेती, मशरूम उत्पादन, शहरी वृक्ष व्यवस्थापन, किचन गार्डन, सेंद्रिय खत व कीड नियंत्रण, जेरबेरा लागवड, जलस्रोतांचा कार्यक्षम वापर, पॅलुडेरियम, शहरी सूक्ष्म बागांचे नियोजन, आधुनिक लँडस्केपिंग तंत्रे तसेच कचऱ्याचे पुनर्वापर या विषयांवर बीएआरसी, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, सल्लागार आणि उद्योजकांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमुळे सहभागींना आधुनिक बागकामाच्या संकल्पना आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व समजून घेण्यास मोठी मदत झाली असून या कार्यशाळेत १६० हून अधिक बागकामप्रेमींनी सहभाग नोंदवला असल्याचे विभागाचे संचालक डॉ. प्रकाश मसराम यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या यशस्वी नियोजनासाठी विभागातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com