उद्योजकांचे प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीवर लक्ष
उद्योजकांचे प्लॅस्टिक उत्पादनांच्या निर्यातीवर लक्ष
भारताला जागतिक पुरवठा साखळीत विश्वासार्ह पर्याय होण्याची संधी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : इराण, अमेरिका आणि इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या भू-राजकीय संघर्षामुळे जागतिक प्लॅस्टिक परिसंस्थेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. ९४,००० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि सुमारे नऊ दशलक्ष रोजगार निर्माण करणारा हा प्लॅस्टिक उद्योग क्षेत्र आहे. उद्योजकांकडून आता तयार प्लॅस्टिक उत्पादनांच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
ऑल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या उद्योग नेत्यांनी सांगितले की, या युद्धामुळे पॉलिमर आयात विस्कळित झाली असून, उत्पादन प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अवघ्या एका आठवड्यात फीडस्टॉकच्या (कच्चा माल) किमतीत सुमारे ४५-५०% वाढ झाल्याने पॉलीएथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनसारख्या महत्त्वाच्या प्लॅस्टिक राळांवर मोठा परिणाम झाला आहे. या घडामोडींचा परिणाम आता खेळणी, बाटलीबंद पाणी आणि इतर प्लॅस्टिक-आधारित वस्तूंच्या किमती वाढण्यात होण्याची शक्यता आहे.
यासोबतच, जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला आहे. शिपमेंटमध्ये विलंब होत आहे आणि लॉजिस्टिक अडचणी वाढल्या आहेत. जहाजांच्या मार्गात बदल केल्यामुळे वाहतुकीचा कालावधी १०-१४ दिवसांनी वाढला असून, आशियातील कंटेनर टंचाईमुळे उद्योगावरील दबाव अधिकच वाढला आहे.
जागतिक स्तरावर अनेक उत्पादकांनी ‘फोर्स मॅज्युअर’ घोषित केली असून, भारतातही त्याचा परिणाम तळागाळात दिसू लागला आहे. वाढत्या पॅकेजिंग खर्चामुळे २,००० हून अधिक लहान बाटलीबंद पाणी उत्पादकांवर गंभीर आर्थिक ताण निर्माण झाला असून ग्राहकांसाठी किंमती वाढण्याची शक्यता आहे. या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर, २६ मार्च २०२६ पासून सुरू होणारे प्लॅस्टिवर्ल्ड २०२६ हे भारताच्या निर्यात क्षमतेला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या प्रदर्शनाद्वारे भारतीय उत्पादकांना जागतिक खरेदीदारांशी जोडले जाईल. तसेच नवकल्पना, गुणवत्ता आणि शाश्वत पद्धतींचे प्रदर्शन करण्यात येईल.
==
जागतिक अडचणींनी जरी मोठी आव्हाने निर्माण केली असली तरी त्यातून भारताला जागतिक पुरवठा साखळीत विश्वासार्ह पर्याय म्हणून उदयास येण्याची संधी आहे. प्लॅस्टिवर्ल्ड २०२६ हे निर्यात वाढविण्यात आणि भारताची जागतिक ओळख अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. लवचिकता आणि रणनीतिक निर्यात धोरणाच्या जोरावर, भारतीय प्लॅस्टिक उद्योग सध्याच्या जागतिक आव्हानांवर मात करत आपला जागतिक विस्तार अधिक मजबूत करण्यास सज्ज आहे.
-अरविंद मेहता, अध्यक्ष, एआयपीएमए

