उपकर प्राप्त इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू होणार

उपकर प्राप्त इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू होणार

Published on

उपकर प्राप्त इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू होणार
म्हाडा दोन दिवसांत तांत्रिक निविदा उघडणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबई शहरातील सुमारे १२ हजार ५०० उपकर प्राप्त (सेस) इमारती असून, त्यांचे म्हाडाकडून स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केले जाणार आहे. त्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या संस्थांची नियुक्ती करण्यासाठी म्हाडाने काढलेल्या निविदाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दोन दिवसांत त्याबाबतच्या तांत्रिक निविदा उघडल्या जाणार आहेत.
मुंबईत शहरात आठ-दहा दशकांपूर्वी उभारलेल्या साडे बारा हजार उपकरप्राप्त इमारती आहेत. यापैकी अनेक इमारती जुन्या झाल्याने मोडकळीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात या इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाकडून सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतीमधील रहिवासी-भाडेकरूंचे संक्रमण शिबिरात स्थलांतर केले जाते.
दरम्यान, मागील पावसाळ्याआधी म्हाडाने समारे ५०० इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यामध्ये जवळपास ९६ इमारती अतिधोकादायक आढळल्या होत्या. त्यामुळे म्हाडाकडून आता सर्वच इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी चार एजन्सी नेमल्या जाणार आहेत. त्याकरिता सात-आठ संस्थांनी ऑनलाइन निविदा भरल्या आहेत. त्यानुसार आलेल्या तांत्रिक निविदा उघडल्या जाणार असून, त्यामध्ये पात्र ठरलेल्याच्या अंतिम निविदा उघडून तत्काळ काम सुरू केले जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

२०-९० हजार रुपयांचा खर्च
म्हाडाने १२ हजार ५०० सेस इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी जवळपास ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, एका इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी २० ते ९० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. इमारतीचा आकार, उंची किती आहे त्यावर ऑडिटचा खर्च अवलंबून असणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com