न्यूरोसायन्स-आधारित शिक्षण निदान प्लॅटफॉर्म भारतात; विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील उणिवा लवकर ओळखण्यावर भर

न्यूरोसायन्स-आधारित शिक्षण निदान प्लॅटफॉर्म भारतात; विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील उणिवा लवकर ओळखण्यावर भर

Published on

न्यूरोसायन्सआधारित शिक्षण निदान प्लॅटफॉर्म भारतात
विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील उणिवा लवकर ओळखण्यावर भर

मुंबई, ता. २१ ः अमेरिकास्थित स्टुडंट एज्युकेशन डायग्नोस्टिक्स (एस) या संस्थेने भारतात आपला न्यूरोसायन्सआधारित शिक्षण निदान प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत समजून घेणे, त्यांच्या शैक्षणिक बलस्थाने व उणिवा ओळखणे आणि वैयक्तिकृत शैक्षणिक विकासाला दिशा देणे, हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे.
एसईडीचा हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांची माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता, संकल्पना समजून घेण्याची पद्धत आणि त्यांची अंमलबजावणी कशी होते, याचे विश्लेषण करतो. मेंदूआधारित मूल्यांकनाच्या मदतीने शिकण्यातील पॅटर्न, ताकद आणि सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्रे ओळखून वैयक्तिक शैक्षणिक आराखडे तयार करण्यात मदत होते. यामुळे शिक्षक आणि पालकांना विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील उणिवा लवकर ओळखून त्यावर योग्य वेळी उपाययोजना करता येणार आहेत.

संस्थेचे संस्थापक श्रीनेश व्ही यांनी सांगितले, की पारंपरिक मूल्यांकन पद्धती केवळ निकाल मोजतात; मात्र विद्यार्थी कसा शिकतो, हे समजून घेत नाहीत. एसईडीच्या माध्यमातून आम्ही शाळा व पालकांना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शिकण्याच्या पद्धती समजून घेण्यास मदत करू इच्छितो, असे ते म्हणाले. या प्लॅटफॉर्मच्या लॉन्चची घोषणा ‘एसईडी लर्निंग इंटेलिजन्स समिट’दरम्यान करण्यात आली. या परिषदेत शिक्षणतज्ज्ञांनी लर्निंग डायग्नोस्टिक्सच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी लवकर ओळखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग होता.

एसईडीचे सीईओ ॲश्ली संबलुक यांनी भारतातील शिक्षण व्यवस्थेबाबत सांगितले, की भारतामध्ये मोठी विद्यार्थीसंख्या असली तरी प्रत्येक विद्यार्थी कसा शिकतो, याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. न्यूरोसायन्सआधारित पद्धतीमुळे ही दरी कमी होऊ शकते. या उपक्रमाला विविध शैक्षणिक संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, शिक्षण क्षेत्रात अधिक वैयक्तिकृत व प्रभावी पद्धतींची गरज अधोरेखित होत आहे. श्री चैतन्य शैक्षणिक संस्थांच्या संचालिका सीमा बोप्पना यांनी या तंत्रज्ञानामुळे शिक्षण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असे मत व्यक्त केले.

तसेच, दक्षिण भारतातील श्रीलंकेचे उप उच्चायुक्त डॉ. गणेशनथन गेथिस्वरन यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, अशा पद्धतींमुळे शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडू शकते, असे नमूद केले. याप्रसंगी एसईडीने भारतातील विविध शैक्षणिक संस्थांसोबत धोरणात्मक भागीदारी करण्याचा मानस व्यक्त केला. या भागीदारीद्वारे न्यूरोसायन्स आणि नैसर्गिक बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक शैक्षणिक दृष्टिकोन मुख्य प्रवाहात आणण्याचा उद्देश आहे. दरम्यान, एसईडी ही संस्था भारतातही आपले कार्य विस्तारत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित शिक्षण प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com