घाटकोपर मुलुंड मध्ये बांधकामासाठी ३६ झाडांची कत्तल
बांधकामासाठी ३६ झाडांची कत्तल
घाटकोपर, मुलुंडमध्ये रस्ता रुंदीकरण, शालेय इमारतीच्या बांधकामात अडथळा
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. २१ : घाटकोपर, मुलुंड, पवई या ठिकाणी रस्ता रुंदीकरण, शालेय इमारतीचे बांधकाम, डीपी रोडच्या कामात सुधारणा करण्यात येणार आहे. मात्र या कामांत ३६ झाडांचा बळी दिला जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे संवर्धन आणि संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सगळ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून केले जाते. मात्र दुसरीकडे विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जाते.
कुर्ला पश्चिम भू. क्र. २६६ आणि २६७ (भाग) निवासी इमारत व महापालिका शालेय इमारतीच्या कामात २० झाडे अडथळा ठरत आहेत. २० पैकी १३ झाडे कापण्यात येणार असून, तीन झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. तर उर्वरित चार झाडांना धक्का लागणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. घाटकोपर पश्चिम लिंक रोड जंक्शन ते शिल्पा इमारतीजवळील जंक्शनपर्यंत २९ झाडे असून, रस्तेकामात अडथळा ठरणारे एक झाड कापण्यात येणार आहे. घाटकोपर पश्चिम अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, गोळीबार रोड जंक्शन ते सुविधा शौचालय उत्तरेकडील बाजूपर्यंत रस्ता रुंदीकरण व रस्तेकामात सुधारणा करण्यात येणार आहे. या कामात १५ झाडे असून, सहा झाडे कापण्यात येणार असून पाच झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार
रिसिव्हिंग सब-स्टेशन साईट, मुंबई मेट्रो लाईन-६, एमटीएनएल कम्पाउंड, आदि शंकराचार्य मार्ग पवई मेट्रो स्टेशनलगत प्रस्तावित ट्रान्स्फॉर्मरच्या कामात आणि बिल्डिंग, एचटी केबल ट्रेन्च आणि जवळील ट्रान्स्फॉर्मच्या कामात २३ झाडे बाधित होत आहेत. यात चार झाडे कापण्यात येणार असून, चार झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. तर उर्वरित १५ झाडांना धक्का बसणार नाही याची काळजी घेत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुलुंड पूर्व द्रुतगती मार्ग ते टाटा कॉलनीदरम्यान १८.३ मीटर डीपी रोडच्या कामात सुधारणा करण्यात येणार आहे. या ठिकाणी २० झाडे आहेत. यापैकी १२ कापण्यात येणार असून, तीन झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

