रतनटाटा

रतनटाटा

Published on

पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे
उपराष्ट्रपती ः रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा

मुंबई, ता. २१ ः ‘आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आज तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे, ही यशाची गुरुकिल्ली आहे. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा,’ असे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे सांगितले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा लोकभवन येथे झाला. त्या वेळी राधाकृष्णन बोलत होते. ‘नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते,’ असेही उपराष्ट्रपती म्हणाले. या वेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, की ‘उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार केले पाहिजे. देशाची प्रगती साधताना तरुणांनी ‘स्किल इंडिया’ आणि ‘पीएम-दक्ष’सारख्या व्यासपीठांचा लाभ घ्यावा. आज ज्यांना पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले, असे नाही. आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा.’

नावीन्यता, प्रयोगशीलता जपावी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
....................
आधुनिक विद्यापीठांनी नावीन्यता, प्रयोगशीलता जोपासली पाहिजे. शिक्षणामुळे शाश्वत प्रगतीकडे जाण्यासाठी चारित्र्य आणि जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली पाहिजे. पदवी मिळवणे म्हणजे शिक्षणाचा शेवट नाही. उलट हा आयुष्यभर चालणाऱ्या शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे. सध्याच्या भू-राजकीय घडामोडींचा जागतिक अर्थव्यवस्था आणि उपजीविकेवर आणि नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले.
----
समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण : फडणवीस
‘केवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड) होतो. तरुणांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे (उदा. एआय, मॅन्युफॅक्चरिंग) प्रशिक्षण देणे आवश्यक असते. त्याचमुळे ‘स्किल इंडिया’मध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी काळानुरूप कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ ‘एआय लिविंग लॅब’सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, की ‘कौशल्य विभागाच्या नुकत्याच आकाराला आलेल्या महिमा योजनांमुळे राज्यभरात कौशल्य विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. नवदिशा केंद्र राज्यातील ३६ ठिकाणी उभारण्यात येत असून त्यात कौशल्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळेल.’

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, की ‘भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राचीन काळी भारतात प्रत्येक कुटुंबातून सूक्ष्म उद्योग उभे राहत होते. हीच परंपरा पुन्हा जोपासण्याची गरज आहे. कौशल्यामुळेच तरुणांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि महाराष्ट्र कौशल्य क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com