मुंबईचा चेहरामोहरा बदलणार! २६ झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांसाठी महापालिकेकडून ''ग्लोबल'' निविदा प्रसिद्ध •​आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मुंबईत संधी; •महापालिकेच्या जमिनीवरील झोपड्यांचा होणार कायापालट

मुंबईचा चेहरामोहरा बदलणार! २६ झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांसाठी महापालिकेकडून ''ग्लोबल'' निविदा प्रसिद्ध •​आंतरराष्ट्रीय कंपन्यांना मुंबईत संधी; •महापालिकेच्या जमिनीवरील झोपड्यांचा होणार कायापालट

Published on

झोपडपट्टीमुक्त मुंबईकडे महापालिकेचे मोठे पाऊल
२६ पुनर्विकास प्रकल्पांसाठी महापालिकेकडून निविदा प्रसिद्ध; रहिवाशांना भाड्याची हमी
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २२ : मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी आणि येथील नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या मालकीच्या जमिनींवरील तब्बल २६ झोपडपट्टी पुनर्विकास योजनांना गती देण्यासाठी पालिकेने जागतिक स्तरावरील ई-निविदा मागवल्या आहेत. या निर्णयामुळे आता मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान आणि गुंतवणूक येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
​मुंबईतील घरांची वाढती मागणी आणि मर्यादित जमीन लक्षात घेता, पालिकेने आपल्या जमिनींवरील झोपडपट्ट्यांचा नियोजनबद्ध विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या २६ प्रकल्पांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, उत्तम दर्जाचे बांधकाम आणि पर्यावरणपूरक गृहनिर्माण संकुले उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जागतिक निविदा प्रक्रियेमुळे परदेशी कंपन्यांनाही या प्रकल्पात सहभागी होता येणार असून, त्यामुळे कामाचा दर्जा आणि गती वाढण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या विविध विभागांतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या २६ झोपडपट्ट्यांचा यामध्ये समावेश आहे. ई-निविदा प्रक्रियेमुळे संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक राहणार असून, पात्र विकसकांची निवड तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर केली जाईल. केवळ घरेच नाही, तर या प्रकल्पांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि उद्याने यांसारख्या नागरी सुविधांचाही विकास केला जाणार आहे.

हक्‍काची पक्‍की घरे मिळणार
​या २६ झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो पात्र कुटुंबांना या पुनर्विकास प्रकल्पामुळे हक्काची आणि पक्की घरे मिळणार आहेत. पुनर्विकासाच्या काळात नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची किंवा भाड्याची जबाबदारीही संबंधित विकसकावर असणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना नवी संजीवनी मिळणार असून, शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com