नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग!
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग!
‘ज्ञानाेबा माउली तुकाराम’च्या गजरात नयनरम्य रिंगण
मुंबई, ता. २२ : टाळ, मृदंग, पखवाज, वीणा यांच्या धीरगंभीर ध्वनीच्या तालावर आबालवृद्ध, स्त्री-पुरुष वारकऱ्यांनी रविवारी विठूनामाच्या जयघोषावर ठेका धरला. निमित्त हाेते, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘भक्ती-शक्ती व्यासपीठ’ आणि ‘एपी ग्लाेबाले’ यांनी वरळी येथील एनएससीआय डाेममध्ये आयाेजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाचे. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा गजर करून देहभान विसरून वाद्यांच्या ठेक्यावर शिस्तबद्ध रिंगण करून भाविकांनी ‘नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग’ याची प्रत्यक्ष अनुभूती दिली.
भक्तिरसात डुंबून भक्तिगीते, नामस्मरणाची गाणी यांच्या ठेक्यावर लहान-मोठे वारकरी भक्तिभावाने ठेका धरून नृत्य करीत होते. रविवारी कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल परिसरातील वेगवेगळ्या गावांतून आलेल्या वारकरी, कीर्तनकार मंडळांनी एकत्रित रिंगण नृत्य करून या भक्तिभावावर कळसाध्याय चढवला. कीर्तनकार भजनी मंडळाच्या किमान एक हजार स्त्री-पुरुष, आबालवृद्ध सदस्य आणि उपस्थित भाविकांनी हा नयनरम्य रिंगण सोहळा सादर केला. रिंगणाच्या मधोमध बसलेले ५० ते ६० बाल पखवाज वादक, रिंगण नृत्य करणाऱ्या भाविकांना साथ देणाऱ्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या आणि हातात वीणा-सतार घेतलेल्या २० ज्येष्ठ भाविक महिलांनी रिंगण नृत्य करणाऱ्या भाविकांना ठेका धरायला साथ दिली. रिंगण नृत्य करतानाच झांजांचा नाद करणाऱ्या शंभर महिलादेखील या वादकांशी सूर साधून ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चा अनुभव उपस्थितांना देत होत्या. त्यापैकी अनेक मंडळांच्या महिलांनी एकाच रंगाच्या साड्या नेसल्याने रिंगण नृत्य पाहताना पुष्पमाळ गुंफल्याचा अनुभव येत होता.
व्यासपीठावरून मुख्य कीर्तनकाराने दिलेल्या सूचनेनुसार, या भाविकांनी जवळपास सैनिकी शिस्तीतच हा सोहळा यशस्वी करून दाखवला. सुरुवातीला ‘जय जय राम कृष्ण हरी’ या भजनासह वाढणारा झांजांचा वेग आणि त्यानुसार भाविकांनी धरलेला ताल रॅप आणि जॅझ संगीताचा ठेका विसरायला लावणारा हाेता. शब्दागणिक भाविकांच्या अंगावर रोमांच उभे राहत हाेते. कृष्णाची भक्ती करताना मीराबाई कशी तल्लीन होत असे किंवा मडक्यांसाठी माती तुडवताना पायाखाली काय आले, याचे संत गोरोबा कुंभारांना भान कसे राहत नसे, या आख्यायिकांचा किंचितसा अनुभवही उपस्थित प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.
व्यासपीठावरून येणाऱ्या सूचनांनुसार एकदा पखवाज वादन, त्यानंतर टाळांचा नाद व त्यानंतर लगेच झांजांचा ध्वनी अशी जुगलबंदी अनुभवायला मिळत हाेती. त्यानंतर भजनाच्या ठेक्यावर मुख्य रिंगण सुरू झाले आणि मधोमध बसलेल्या, उभ्या असलेल्या महिला-पुरुष भाविकांनी मधल्या चौकटीतून बाहेर पडून त्या चौकटीभोवती झांजांच्या तालावर मंद रिंगण नृत्य सुरू केले आणि बघता-बघता रिंगणाचा एक गोल फेरा पूर्णही झाला. सुमारे तासभर हा नयनरम्य सोहळा सुरू होता. नृत्य करणाऱ्या सहभागींची अवस्था ‘वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ’ अशी झाली होती. सुरुवातीला शेजारी उभे राहून मोबाईल कॅमेऱ्यातून या सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ काढणाऱ्या भाविकांचे पायदेखील या नृत्यात आपसूक ओढले गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

