मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी
अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, ता. २२ : चंडीगड (पंजाब) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय जिम्नॅस्टिक्स (पुरुष) स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. १४ ते २० मार्चदरम्यान झालेल्या या स्पर्धेत देशभरातील सुमारे ५८ विद्यापीठांमधील एकूण २३६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण, दमदार आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपले स्थान भक्कम केले.
स्पर्धेदरम्यान संघाने उत्कृष्ट समन्वय, जिद्द आणि उच्च प्रतीचा खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्यांना जोरदार आव्हान दिले. या यशामागे प्रशिक्षक अभिजित शिंदे यांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले. तसेच संघ व्यवस्थापक श्यामसुंदर राजेश तिवारी यांनी संघाच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
संघातील खेळाडू आर्यन दावंडे याने वैयक्तिक गटात उल्लेखनीय कामगिरी करत फ्लोअर एक्सरसाइजमध्ये सुवर्णपदक तसेच टेबल व्हॉल्टमध्ये रौप्यपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या संघात आर्यन दावंडे, आदित्य दिघे, रुद्र चाफेकर, सार्थक रावूल, हर्ष कदम, मानस घोडेकर आणि अथर्व तावडे यांचा समावेश होता.
या चमूच्या उल्लेखनीय यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

