तिकिट तपासनिसाकडून प्रवाशाला मारहाण

तिकिट तपासनिसाकडून प्रवाशाला मारहाण

Published on

तिकीट तपासनिसाकडून प्रवाशाला मारहाण


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईहून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या दादर-बलिया एक्स्प्रेसमध्ये तिकीट तपासनिसाकडून एका प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून, तिकीट तपासणीच्या वर्तणुकीवर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करीत होता. तिकीट तपासणीदरम्यान तपासणीस आणि प्रवाशामध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे धक्काबुक्की आणि मारहाणीमध्ये झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये तिकीट निरीक्षक संबंधित प्रवाशाने मद्यप्राशन केल्याचा आरोप करीत त्याला मारहाण करताना दिसत आहे. मात्र प्रवाशाने खरोखर मद्यपान केले होते का, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. घटनेदरम्यान डब्यात उपस्थित इतर प्रवाशांनी हा प्रकार आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केला. काही प्रवाशांनी या घटनेत मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हा व्हिडिओ समाजमाध्यामांवर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित तिकीट निरीक्षकाच्या वर्तनाबाबत चौकशी होणार का तसेच या घटनेवर रेल्वे प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे रेल्वेतील प्रवासी सुरक्षेचा आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वर्तनशैलीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com