दीर्घकालीन आजारामुळे बिबट्याचा मृत्यू
दीर्घकालीन आजारामुळे बिबट्याचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (बोरिवली) नर बिबट्या ‘बिट्टू’चा दीर्घकालीन आजाराने शनिवारी (ता. २१) मृत्यू झाला. बिट्टूच्या मृत्यूने उद्यानातील पशुवैद्यकीय टीम आणि प्राणीप्रेमींनी शोक व्यक्त केला.
बिट्टूचा जन्म ठाणे वन विभागातील येऊर परिसरात झाला होता. ४ डिसेंबर २०१९ला तो काही दिवसांचा बछडा असताना जंगलात सापडला आणि वन विभागाने त्याचा बचाव केला. तेव्हापासून त्याचे संगोपन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करण्यात आले. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून त्याच्या तब्येत ढासळत होती. सुरुवातीला लक्षणे दिसताच उपचार सुरू झाले, पण प्रकृती बिघडतच गेली. सोनोग्राफी तपासणीत ‘पॉलीसिस्टिक किडनी डिसीज’चे निदान झाले. हा आजार मूत्रपिंड निकामी करतो. शेवटी अंतर्गत गुंतागुंत वाढली आणि उपचार करूनही बिट्टूला वाचविता आले नाही. पशुवैद्यकीय पथकाने सविस्तर शवविच्छेदन केले, ज्यात मूत्रपिंडामधील सिस्ट्स आणि बहुअवयव निकामी होण्याचे स्पष्ट पुरावे मिळाले. सर्व जैविक नमुने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ येथे हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी पाठविले आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी म्हणाले, ‘‘बिट्टूचे संगोपन आमच्यासाठी कौटुंबिक जबाबदारी होती. दीर्घकालीन आजारामुळे त्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या आठवणी आम्ही जपू.’’ बिबट्यांसारख्या प्राण्यांना होणारे आजार रोखण्यासाठी नियमित तपासणी आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

