डॉक्टरांची बायोमेट्रिक हजेरी सक्तीची
डॉक्टरांची बायोमेट्रिक हजेरी सक्तीची
रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (एचबीटी) ट्रॉमा केअर रुग्णालयात डॉक्टरांची बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. रविवारपासून ही प्रणाली लागू करण्यात आली असून, डॉक्टर आणि इंटर्न यांना हजेरी नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर नियंत्रण येणार असून, रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल.
बायोमेट्रिक हजेरीशिवाय वेतन, भत्ते किंवा रजा मंजूर होणार नसल्याने डॉक्टर आणि इंटर्न नियमितपणे ड्युटीवर उपस्थित राहू लागले आहेत. रुग्णालयात डॉक्टर गैरहजर असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, काही डॉक्टर ड्युटी न करता वेतन घेत असल्याचा प्रकारही समोर आला होता. ऑक्टोबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान ६० ते ७० डॉक्टरांची नियुक्ती नियमांचे पालन न करता करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. अनेक डॉक्टर रुग्णालयात न येताही बनावट स्वाक्षरीच्या आधारे त्यांचे वेतन काढले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेने तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती भरती प्रक्रिया, उपस्थिती नोंदी आणि वेतन देयकांची तपासणी करीत आहे.
रुग्णांना थेट फायदा
बायोमेट्रिक प्रणाली लागू झाल्यानंतर रुग्णालयातील कामकाजात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. पूर्वी डॉक्टर किंवा तांत्रिक कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात महागड्या तपासण्या कराव्या लागत होत्या. आता आयसीयू आणि आपत्कालीन विभागात इंटर्न तैनात करण्यात आल्याने रुग्णांना वेळेवर आणि चांगली सेवा मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

