महिला वाचकासांठी ‘सॅनिटरी नॅपकिन’ची सुविधा
महिला वाचकासांठी ‘सॅनिटरी नॅपकिन’ची सुविधा
माहीम सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईतील सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा जतन करणाऱ्या जुन्या व संपन्न वाचनालयांपैकी एक असलेल्या माहीम सार्वजनिक वाचनालयाने आपल्या ५०व्या वर्षात पदार्पण करत असताना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाचनालयात अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिला वाचकांची मोठी संख्या लक्षात घेऊन, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथे मोफत सॅनिटरी नॅपकिन सुविधा सुरू करण्यात आली आहे.
वाचनालयाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य महिला आणि विद्यार्थिनी आहेत. विशेषतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी येथे सलग आठ ते १२ तास बसून वाचन करतात. अशा वेळी मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये आणि त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू नये, या सामाजिक जाणिवेतून वाचनालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वी क्लब विलेपार्ले यांच्या सहकार्याने ही सेवा ८ मार्चपासून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१५ मे १९७७ला सामाजिक कार्यकर्ते मामा ब्रह्मे आणि आबा अत्रे यांनी या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला दादर वाचनालयाचा भाग असलेले हे वाचनालय १ एप्रिल १९९६ पासून स्वतंत्रपणे कार्यरत झाले. आज या वाचनालयात १,८०० हून अधिक सदस्य असून ५५ हजारांहून अधिक पुस्तकांचा खजिना उपलब्ध आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांमुळे हे वाचनालय अभ्यासकांचे केंद्र बनले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाने २००५-०६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने वाचनालयाला गौरविले आहे.
केवळ पुस्तकेच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून वाचनालय अनेक उपक्रम राबवते. ‘लायब्ररी आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी बसून आठ पुस्तके पोहोचवण्याची सुविधा, रक्तदान व आरोग्य उपक्रमांतर्गत तातडीच्या वेळी रक्तदाता उपलब्ध करून देणे आणि आरोग्य चर्चासत्रे आयोजित करणे तसेच मोफत कायदेशीर सल्ला आणि पुस्तकदान उपक्रमही राबवले जात आहेत. या वाचनालयाला न्यूरोसर्जन डॉ. रामाणी, प्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे, अभिनेत्री सीमा देशमुख, सुलभा देशपांडे, उद्योजक केसरी पाटील यांसारख्या अनेक दिग्गजांचे सदस्यत्व लाभले आहे.
सध्या वाचनालय ज्या जागेत सुरू आहे, ती जागा अपुरी पडत आहे. वाचनालयाचा विस्तार करण्यासाठी महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळेची मागणी करण्यात आली आहे; परंतु अद्याप त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
- मंदार भावे,
कार्यवाहक, माहीम सार्वजनिक वाचनालय
वाचकांसाठी जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. सॅनिटरी नॅपकिन सुविधा हा त्याचाच एक भाग असून, महिलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, हाच आमचा हेतू आहे.
- संदीप पेडणेकर, ग्रंथपाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

