खासगी वित्त कंपनीची चार कोटींना फसवणूक

खासगी वित्त कंपनीची चार कोटींना फसवणूक

Published on

खासगी वित्त कंपनीची चार कोटींना फसवणूक

मुंबई, ता. २४ : यंत्रमागासाठी कर्ज घेत अग्रगण्य खासगी वित्तीय संस्थेची तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुरत येथील कंपनी व मालकांविरोधात वरळी पोलिसांनी बुधवारी (ता. १८) गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत येथील सोनाली एक्झिम कंपनीचे मालक दीपक अग्रवाल, दिव्या अग्रवाल यांनी दोन वर्षांपूर्वी अद्ययावत यंत्रमाग विकत घेण्यासाठी वित्तसंस्थेकडे सुमारे चार कोटींच्या कर्जासाठी प्रस्ताव सादर केला. अग्रवाल दाम्पत्य आणि ही यंत्रे विकणाऱ्या कंपनीकडून व्यवहाराची खात्री करून घेत वित्त संस्थेने दोन टप्प्यांत चार कोटींचे कर्ज वितरित केले. अग्रवाल दाम्पत्याने व्याजाचे तीन हप्ते नियमित भरले; मात्र नंतरचे बुडवले. वित्त संस्थेने सुरत येथील कंपनीत प्रत्यक्ष भेट देत चौकशी केली असता तेथे यंत्रमाग आढळले नाहीत. ते चीनवरून आयात होणार आहेत, वाटेत आहेत, अशी कारणे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र या कंपनीने यंत्रमाग विकत घेतलेले नसून कर्जापोटी घेतलेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे स्पष्ट होताच वित्त संस्थेने तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या तक्रारीच्या आधारे अग्रवाल दाम्पत्य आणि त्यांना यंत्रमाग विकल्याचा कागदोपत्री आभास निर्माण करणारे व्यावसायिक भावेश खेतारिया यांच्याविरोधात १८ मार्चला गुन्हा नोंदविण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com