सुलतान मलिकसह दोघांना अटक
सुलतान मलिकसह दोघांना अटक
मुंबई, ता. २४ : मुलुंड येथे तीन तरुणांवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला करून दहशत माजविणाऱ्या मलिक टोळीची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. यातील मुख्य आरोपी सुलतान आणि त्याचा साथीदार महिपाल यास मंगळवारी (ता. २४) अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सुलतान हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सज्जू मलिक याचा पुतण्या आहे. त्याने साथीदारांसोबत रविवारी (ता. २२) सोहेल खान, मंथन खातू आणि पलविंदर संधू या तिघांवर हल्ला केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी तरुण भांडुपमध्ये एकाच परिसरात राहतात. सुलतान आणि त्याच्या साथीदारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. रविवारी वाहनाचा हॉर्न वाजवण्यावरून सोहेल यास सुलतान व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. सोहेलच्या मदतीसाठी आलेल्या खातू, संधू यांच्यावर चाकूने वार केले होते. या हाणामारीत सहभागी अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

