मानलेल्या भावाकडून शिक्षिकेसह इतरांना ५८ लाखांचा गंडा
मानलेल्या भावाकडून शिक्षिकेसह इतरांना ५८ लाखांचा गंडा
मुंबई, ता. २४ : शिक्षिकेसह तिचे नातेवाईक आणि मित्रपरिवारास शासकीय आस्थापनांमध्ये नोकरीस लावण्याचे प्रलोभन दाखवत तब्बल ५८ लाख रुपयांना फसवणाऱ्या विजय पाटील या भामट्याविरोधात भांडुप पोलिसांनी सोमवारी (ता. २३) गुन्हा नोंदवला. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपी पाटील तिचा मानलेला भाऊ होता. त्याने सुरुवातीला विविध व्यवसाय करण्याच्या निमित्ताने या महिलेकडून छोटी-मोठी आर्थिक मदत घेतली. ती रक्कम त्याने कधीच परत केली नाही. या महिलेच्या नावे आरोपीने परस्पर एक कंपनी सुरू करून त्याद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये मालवाहू वाहने भाड्याने लावल्याचे भासवले. ॲपआधारित टॅक्सीसेवेत वाहने लावल्याचा आभास निर्माण केला. तसेच तक्रारदार महिला, तिच्या पतीसह परिचयातील सुमारे दहा ते बारा व्यक्तींना महापालिका, राज्य आणि केंद्र शासनातील विविध आस्थापनांमध्ये नोकरी देतो, असे सांगून सुमारे ५८ लाख रुपये उकळण्याचा आरोप या महिलेने आपल्या तक्रारीत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

