

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईची जागतिक ओळख अधिक गडद करण्यासाठी दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड या चारही मुख्य प्रवेशद्वारांचे सुशोभीकरण आणि परिसर विकास प्रकल्प कालबद्ध पद्धतीने राबवण्याचे आदेश महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. या प्रकल्पांची संकल्पना पुढील १५ दिवसांत सादर करण्याचा निर्देश त्यांनी प्रशासनाला दिला आहे. यामध्ये ‘ऐरोली प्रवेशद्वार’ प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार केवळ रस्ता नसून ती मुंबईकरांच्या अस्मितेची ओळख असणार आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच महापालिकेच्या महसुलातही वाढ होणार आहे. याबाबत समिती सभागृहात आज (ता. २५) संयुक्त बैठक पार पडली. या वेळी महापौर बोलत होत्या. या बैठकीला प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा, डॉ. अविनाश ढाकणे, विविध विभागांचे उपायुक्त, प्रमुख अभियंता आणि सिडकोसह इतर शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांच्या उभारणीसाठी जागा निश्चिती, सध्याचे प्रकल्प आणि भविष्यातील नियोजन यांचा विचार करून १५ दिवसांत आराखडा सादर करावा लागणार आहे. सर्वात आधी ऐरोली प्रवेशद्वाराचे काम हाती घेतले जाईल आणि त्याच धर्तीवर उर्वरित तीन प्रकल्पांना गती दिली जाईल. प्रवेशद्वारांच्या जोडीला तिथे पर्यटन केंद्र विकसित करणे, हरित क्षेत्र वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर दिला जाणार आहे.
सीएसआरमधून निधी उभारणार
या प्रकल्पासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) पैसे उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. यामुळे पालिकेच्या तिजोरीवरील भार कमी होऊन निधीची बचत होईल.
समन्वयासाठी सूचना
या प्रकल्पासाठी सिडको, मीठ आयुक्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या विविध विभागांनी आपसात समन्वय साधावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जागेची उपलब्धता आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सल्लागारांचीही मदत घेतली जाणार आहे.
• ऐरोली प्रवेशद्वाराला प्राधान्य
•
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.