

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : शहरात वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरामदायी आणि गारेगार प्रवासासाठी प्रवासी आता मोठ्या प्रमाणात एसी लोकलला पसंती देत असल्याचे चित्र आहे. यंदा एसी लोकलच्या प्रवासीसंख्येत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. एका दिवशी जवळपास चार लाख प्रवासी गारेगार प्रवासाचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, ९ मार्चला एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तीन लाख ८९ हजार ११३ इतकी झाली असून, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तसेच ५ मार्चलाही तीन लाख ७४ हजार ८१७ प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला. गर्दी आणि उकाड्यापासून बचाव करण्यासाठी मुंबईकरांचा एसी लोकलकडे वाढता कल असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
मार्चमध्ये एसी लोकलमधील दररोजची सरासरी प्रवासीसंख्या सुमारे २.०५ लाख आहे. फेब्रुवारीमध्ये ही संख्या १.५८ लाख, जानेवारीमध्ये १.४४ लाख, तर डिसेंबर २०२५मध्ये १.३८ लाख होती. म्हणजेच दर महिन्याला प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मार्चमध्ये २५ टक्के, फेब्रुवारीमध्ये १५.३ टक्के आणि जानेवारीमध्ये १०.८ टक्के वाढ झाली आहे.
एसी लोकल फेऱ्यांमध्येही वाढ
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. डिसेंबर २०२५मध्ये १०९ फेऱ्या चालत होत्या. जानेवारी २०२६मध्ये त्या १२१ करण्यात आल्या, तर मार्च २०२६मध्ये ही संख्या वाढून १३३ झाली आहे.
यंदा दोन एसी फेऱ्यांमध्ये वाढ
दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी व्हावा, यासाठी यंदा दोन एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अभय चौहान यांनी सांगितले.
दरवाजांमुळे हाल
एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबरोबरच गाड्या वेळेत धावणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच एसी लोकलचे दरवाजे अनेकदा बंद राहण्याची समस्या प्रवाशांसमोर येते. त्याकडेही रेल्वेने लक्ष देणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले.
दररोजची सरासरी प्रवासीसंख्या (लाखांमध्ये)
महिना २०२६ २०२५ वाढ (टक्के)
मार्च २.०५ १.६४ २५
फेब्रुवारी १.५८ १.३७ १५.३
जानेवारी १.४४ १.३० १०.८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.