

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात!
प्रशासनाच्या हलगर्जीमुळे मार्चच्या पगारावर कुऱ्हाड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्च २०२६च्या वेतनातून प्रत्येकी ३० ते ५० हजार रुपयांची कपात होण्याची शक्यता निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीमुळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे कर्तव्य बजावूनही हातात पगार पडणार नसल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. ‘पगार नाही तर कामही नाही,’ असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याची माहिती ‘दि म्युनिसिपल युनियन’ने दिली आहे.
महापालिकेचे सर्व कामकाज सध्या ‘सॅप’ या संगणकीय प्रणालीद्वारे चालते. निवडणूक कर्तव्य, बाह्य कर्तव्य किंवा रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा अहवाल संबंधित विभागाच्या प्रतिवेदन अधिकारी, पुनर्विलोकन अधिकारी आणि आस्थापना प्रमुखांनी वेळेत अपडेट करणे आवश्यक होते. मानव संसाधन विभागाने २ मार्च २०२६ला यासंदर्भात स्पष्ट परिपत्रके काढूनही अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्याने हजारो कामगारांच्या उपस्थितीची नोंद संगणकीय प्रणालीत होऊ शकलेली नाही. याचा थेट परिणाम मार्चच्या वेतनावर झाला असून, कर्माचाऱ्यांच्या वेतनात कपातीची माहिती पुढे आली आहे. महापालिकेचे अनेक कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर तैनात होते. ऊन, पाऊस, पूरस्थिती किंवा महामारीच्या काळात २४ तास सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय चुकीमुळे वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी याप्रकरणी महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास मुंबई महापालिकेच्या कामकाजावर आंदोलनाचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.