

फसव्या फोन कॉलची धास्ती कायम
पती, मुलाला अटक केल्याची भीती घालून लाखोंची फसवणूक
सकाळ वृृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : कुटुंबातील सदस्याला अटक केल्याची थाप मारून आर्थिक फसवणुकीचे सत्र शहरात सुरू होते की काय, याबाबत सायबर पोलिसांना धास्ती वाटते आहे. मालाड परिसरात मंगळवारी अशाच एका फोन कॉलद्वारे वृद्धास घाबरवण्यात आले आणि १.७५ लाख रुपये उकळण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी असे फसवे फोन कॉल परदेशातून विशेषतः +९२ या पाकिस्तान देशाचा संकेतांक असलेल्या सिम कार्डवरून देशभरातील अनेक नागरिकांना करून आर्थिक गंडा घालण्यात आला होता. या गुन्ह्यांमध्ये वृद्धांना लक्ष्य केले जात होते. सायबर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम आभासी अटक किंवा फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपइतकी मोठी नसली तरी फसवणुकीसाठीची धडपड अर्थात फोन कॉल आक्रमकपणे केले जात होते.
मालाड येथे राहणाऱ्या सुशीलकुमार कुलश्रेष्ठ (६७) यांना मंगळवारी असाच एक व्हॉट्सॲप कॉल आला. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्तीने पोलिस असल्याचे सांगितले. तुमच्या मुलाला एका गंभीर गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. थर्ड डिग्री दिली तेव्हा त्याने तुमचे नाव सांगितले. त्वरित दोन लाख रुपये सांगू त्या खात्यावर पाठवून द्या अन्यथा दोघांना अटक होईल, असे बजावले. इतकेच नव्हे तर हा फोन सुरू असताना मागून कोणीतरी बाबा मला वाचवा, असे म्हणत रडत असल्याचे सुशीलकुमार यांनी ऐकले.
याप्रसंगामुळे तक्रारदार घाबरले. पोलिसांनी आपल्या मुलाला ताब्यात घेतले. ते आपल्यालाही अटक करणार, यावर त्यांना विश्वास बसला. त्यांनी तडक पैशांची जुळवाजुळव केली. १.७५ लाख रुपये त्यांनी विविध खात्यांवर वळतेही केले.
थोड्याच वेळात त्यांनी अगदी गांभीर्याने हा सारा प्रसंग आपल्या सुनेला सांगितला. तीही एका क्षणासाठी घाबरली. मात्र तिने लगेचच आपल्या पतीला फोन केला. त्याने फोन उचलला. त्याला अर्थात तक्रारदाराच्या मुलाने असे आपल्यासोबत काहीही घडलेले नाही. मी सुरक्षित आहे. कार्यालयात नेहमीप्रमाणे काम करतो आहे, असे सांगितले.
या प्रसंगानंतर तक्रारदाराने तो प्रसंग पुन्हा आठवला. अनोळखी व्यक्तीने आपल्याला व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला. तो जे सांगेल त्यावर आपण विश्वास ठेवला. मात्र एका क्षणी ती भीती बाजूला सारून थेट मुलाला फोन केला असता तर फसवणूक झाली नसती, ही उपरती तक्रारदाराला झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश प्रकरणांमध्ये घाबरलेल्या तक्रारदाराला संबंधित नातेवाइकाशी बोलून खात्री करावी हे सुचत नाही. याच मानसिकतेचा भामटे फायदा घेतात.
फसवे फोन आणि निमित्त
मुलाने, पतीने अपघात केला, बलात्कार केला, खून केला, फसवणूक केली यापैकी कोणतेही निमित्त पुढे करून भामटे अटक करू, अटक केल्याची भीती घालतात. पुढल्या काही क्षणांत मागण्या मान्य केल्यास सुटका करू, असे सांगतात. विशेषतः अशा फसव्या फोनद्वारे वृद्ध महिलांना अधिक लक्ष्य केले जाते.
खात्री करा
असा फोन आल्यास सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांना संपर्क साधून खरेच असा प्रकार घडला आहे का, याबाबत खात्री करा. खात्री झाल्यास पुढील फसवणूक होणार नाही. तांत्रिक अडचणींमुळे पती, मुलाला फोन लागत नसेल तर पोलिस नियंत्रण कक्ष, नजीकची पोलिस चौकी किंवा पोलिस ठाण्यात संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.