

शीतल म्हात्रे यांचा ‘मातोश्री’वर निशाणा
अंधारे-पेडणेकरांचे प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात यांच्या फार्महाउसवर शासकीय यंत्रणेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी या वादात उडी घेत ‘हे पाणी मातोश्रीवरील ‘मॅडम’च्या सांगण्यावरून दिले गेले,’ असा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हात्रेंवर पलटवार केला आहे.
शीतल म्हात्रे म्हणाल्या, ‘खरात महाराजांच्या फार्महाउसवर टँकर पाठवण्याचे आदेश कोणाचे होते? मातोश्रीवरील ‘मॅडम’च्या शब्दाखातर ही पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.’ या विधानामुळे ठाकरे गटात संतापाची लाट उसळली आहे. म्हात्रे यांच्या आरोपांना उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘खोट्या आरोपांच्या फैरी झाडून स्वतःचे पाप झाकता येत नाही. जर आदेश आमचे होते, तर मग सत्तेत बसलेले लोक काय करीत होते? केवळ चिखलफेक करण्यासाठी महिला नेत्यांचा वापर करणे, ही शिंदे गटाची जुनी सवय आहे,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या वादात म्हात्रेंना लक्ष्य केले. ‘मातोश्रीवर आरोप करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. खरात महाराज कोणाचे भक्त आहेत आणि त्यांना राजाश्रय कोणाचा आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. मूळ मुद्द्याला बगल देण्यासाठीच असे वैयक्तिक आरोप केले जात आहेत,’ असे पेडणेकर यांनी ठणकावून सांगितले.