

दर्जेदार आरोग्य सेवेचा संकल्प
मुख्यमंत्र्यांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : ‘मुंबईकर व राज्यातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा आमचा संकल्प असून त्यासाठी व्यवस्था उभारल्या जातील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. २७) दिली.
मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक महापालिका (शीव) सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा दोनअंतर्गत रुग्णालय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी भूमिपूजन करण्यात आले. या वेळी महापौर रितू तावडे, आमदार तमिल सेल्वन, सुनील शिंदे, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, उपमहापौर संजय घाडी, आयुक्त भूषण गगराणी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ‘गेली अनेक वर्षे रुग्णालयाच्या विस्तारासाठी आमदार तमिल सेल्वन यांनी पाठपुरावा केला. मुंबईतील विविध भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय गरजेचे असून ७० खाटांपासून सुरू झालेले हे रुग्णालय आज १,८०० खाटांवर पोहोचले असून सेवा देत आहे. पुनर्विकासानंतर खाटांची क्षमता दुप्पट होईल व ३,२८६ खाटांचे रुग्णालय होईल, सध्या रुग्णालयावर मोठा ताण आहे, रुग्णालयात आलेल्या कुणालाही उपचारांविना परत पाठवले जात नाही, राज्याच्या व देशाच्या विविध भागांतून येथे रुग्ण येथे येतात, त्यामुळे आधुनिकीकरण व विस्तार गरजेचे होते.’ या वेळी सेल्वन यांच्याकडून रुग्णांसाठी बॅटरीवर चालणारी ई-रुग्णवाहिकेचे (बग्गी) लोकार्पण करण्यात आले.
..
टाटा रुग्णालयावरील ताण कमी
अडीच हजार कोटी खर्च करून हे काम केले जात असून मुंबईकरांना आधुनिक रुग्णालय मिळेल. दोन टप्प्यांत हे काम होईल. सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे कर्करोगासाठी स्वतंत्र इमारत उभारल्याने टाटा रुग्णालयावरील ताण कमी होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. महात्मा फुले जनआरोग्य सुविधा योजनेद्वारे प्रत्येकाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात असून त्यामध्ये २,४०० आजारांचा समावेश आहे. ४,५०० रुग्णालये संलग्न असून नऊ आजारांना २२ लाखापर्यंत खर्च केला जातो, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.