

पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना वेग
लोकप्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष पाहणी करा, पालिका आयुक्तांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईत पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, या कामात पारदर्शकता आणि वेग राखण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
शनिवारी (ता. २८) आयोजित आढावा बैठकीत त्यांनी सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना नालेसफाईच्या नियोजनाबाबत कडक सूचना केल्या.
नालेसफाईच्या कामात स्थानिक नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा विश्वास संपादन करण्यासाठी आयुक्त गगराणी यांनी विशेष पाऊल उचलले आहे. प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधींना या कामाची नियमित माहिती देऊन त्यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणी दौरे आयोजित करावेत, असे आयुक्तांनी बजावले आहे. तसेच नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत निश्चित केलेल्या स्थळी हलवण्याचे आदेशही दिले.
मुंबईत पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी रेल्वे आणि मेट्रो प्राधिकरणाच्या हद्दीतील नाल्यांची सफाई महत्त्वाची असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधून संयुक्त पाहणी करावी. ३१ मेपर्यंत पर्जन्य जलवाहिन्यांची सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले, की नालेसफाईच्या कामात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल. मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम रविवारपासून सुरू होत असून, संपूर्ण यंत्रणा आता युद्धपातळीवर काम करणार आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, उपायुक्त प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता कल्पना राऊळ यांच्यासह सर्व परिमंडळ सहआयुक्त आणि सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
डिजिटल डॅशबोर्डवर नालेसफाईची रिअल टाइम प्रगती, छायाचित्रे आणि चित्रफिती नागरिकांना पालिकेच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
समुद्रात जाणारा कचरा रोखणार
कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी मोगरा, मजास, मानखुर्द, सोमय्या, वाकोला आणि धारावी नाल्यांच्या ठिकाणी एकूण १४ ट्रॅश बूम तैनात करण्यात येणार आहेत.
एआय प्रणालीद्वारे देखरेख
नालेसफाईच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर केला जाणार आहे. गाळ काढतानाच्या व्हिडिओंचे विश्लेषण याद्वारे केले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.