‘हीट वेव्ह’चा तडाखा

‘हीट वेव्ह’चा तडाखा
Published on

राज्याला ‘हीट वेव्ह’चा तडाखा
उष्माघाताच्या धोक्यात वाढ; आरोग्य यंत्रणा सतर्क

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईसह राज्यभरात ‘हिट वेव्ह’चा तीव्र तडाखा बसत असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या एकात्मिक आरोग्य माहिती प्रणालीच्या आकडेवारीनुसार, उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन लाख ५० हजार ८३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी मुंबईमध्ये ५१ हजार ८२६ नागरिकांची तपासणी करण्यात आल्याची नोंद आहे.

पालघर, रायगड, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे एकूण पाच रुग्ण आढळले असून त्यांच्यावर तत्काळ उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ठाणे (४५,२९९), पालघर (३३,८५०), पुणे (२३,२३४), नागपूर (२२,७७२) आणि चंद्रपूर (२१,७७५) या जिल्ह्यांत सर्वाधिक तपासणी करण्यात आली आहे. तर, मुंबईलगतच्या मिरा रोड येथील खासगी रुग्णालयात उष्माघातासारख्या लक्षणांसह रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. मार्चच्या मध्यापासून आतापर्यंत किमान दोन ते तीन रुग्ण उष्माघाताच्या लक्षणांसह उपचारासाठी आले आहेत. या रुग्णांमध्ये बहुतेक जण ५० वर्षांवरील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारीच्या मध्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून मुंबईतही पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. उकाडा आणि वाढलेली आर्द्रता यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाने एप्रिल आणि मेमध्ये तापमान आणखी वाढण्याचा इशारा दिला असून ‘हिट वेव्ह’ अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यात दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्णताविकार प्रतिबंधासाठी विशेष आराखडा राबवला जातो.

वयोगटानुसार तपासणी
प्रौढ २,२८,४८६
लहान मुले २२,३६४


आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ला
उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, हलक्या रंगाचे सैल कपडे वापरणे, उन्हात बाहेर पडताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर, घर थंड ठेवण्यासाठी पंखे, कुलर आणि ओलसर पडद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळा, कष्टाची कामे करू नका, लहान मुलांना वाहनात एकटे सोडू नका आणि मद्य, चहा, कॉफी तसेच सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन टाळा, असा सल्ला दिला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून लक्षणे जाणवल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com