

परळच्या ऐतिहासिक बीआयटी चाळीत डॉ. आंबेडकरांना १०० वकिलांची मानवंदना
१४ एप्रिलला भव्य सोहळा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिलला परळ येथील ऐतिहासिक बीआयटी चाळीत भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या वास्तूत बाबासाहेबांचे २२ वर्षे वास्तव्य होते त्या ठिकाणी १०० वकिलांमार्फत विशेष मानवंदना दिली जाणार आहे. राजा साक्षी फाउंडेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
परळची बीआयटी चाळ ही बाबासाहेबांच्या अनेक आंदोलनांची आणि वैचारिक मशागतीची साक्षीदार आहे. याच ठिकाणी त्यांनी प्रदीर्घकाळ वास्तव्य केले आणि आपल्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराज बाबासाहेबांना भेटण्यासाठी ज्या ठिकाणी आले होते, ते बाबासाहेबांचे घर याच चाळीत आहे. या ऐतिहासिक महत्त्वामुळेच येथे होणाऱ्या वकिलांच्या मानवंदनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
लालबाग-परळ येथील विठ्ठल चव्हाण मार्ग, बीआयटी चाळ क्रमांक १ व ६ च्या परिसरात हा सोहळा रंगणार आहे. सकाळी १०:३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होईल. सकाळी ११:१० वाजता बाबासाहेबांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर सकाळी ११:४० वाजता सर्व उपस्थित वकिलांमार्फत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून अनोखी मानवंदना दिली जाणार आहे.
ही ऐतिहासिक वास्तू ज्या परिसरात आहे तेथील सध्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. देश-विदेशातील अनुयायी आणि अभ्यासक या ठिकाणी भेटीसाठी येतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी महामानवाच्या स्मृती जतन करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक आणि भव्य प्रवेशद्वार उभारावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या जयंतीनिमित्त या मागणीचा पुनरुच्चार करण्यात येणार आहे.
परळची ही बीआयटी चाळ केवळ एक वास्तू नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची आणि वैचारिक क्रांतीची जिवंत साक्ष आहे. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभारले जावे, ही आमची आग्रही मागणी आहे. सामाजिक न्याय विभागाने या परिसराचा विकास करून बाबासाहेबांच्या स्मृतींचे जतन करावे.
- साक्षी दरेकर,
प्रमुख, राजा साक्षी फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.