

दिव्यांगांचे सर्वसमावेशक सक्षमीकरण
२१ प्रवर्गातील दिव्यांगांना शासन योजनांचा लाभ
मुंबई, ता. २९ : ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या सर्व २१ प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना राज्य शासन तसेच तत्सम यंत्रणांच्या विविध योजना, सवलती, लाभ, अनुदान व इतर सुविधांसाठी पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, राज्यातील अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास मोठी चालना मिळणार आहे,’ अशी माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.
तुकाराम मुंढे यांनी सांगितले, की ‘१९९५च्या अधिनियमानुसार केवळ सात प्रवर्गापुरते मर्यादित असलेले लाभ आता विस्तारून सर्व २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना उपलब्ध होणार आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ लागू झाल्यानंतरही काही शासकीय कार्यालयांमध्ये जुन्या निकषांनुसारच लाभ दिला जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे नव्याने समाविष्ट प्रवर्गातील दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर शासनाने स्पष्ट, एकसंघ व सर्वसमावेशक धोरण निश्चित करत हा निर्णय घेतला आहे.’ या निर्णयानुसार अस्थिव्यंग, कुष्ठरोगमुक्त, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्ल हल्ला पीडित, पूर्णतः अंधत्व, अंशतः अंध, कर्णबधिरता, वाचा, भाषा दोष, बौद्धिक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, स्वमग्नता, मानसिक आजार, मल्टिपल स्क्लेरोसिस, पार्किन्सन, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, सिकल सेल, मज्जासंस्थेचे तीव्र आजार आणि बहुविकलांग अशा सर्व २१ प्रवर्गांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वसमावेशक विकास
नव्या निर्णयामुळे दिव्यांग व्यक्तींना गृहनिर्माण योजना, विविध शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग विवाह योजना, गुणवत्ता पुरस्कार, प्रशिक्षित दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य, दिव्यांग व्यक्तींना साधने व उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य, राज्य पुरस्कार योजना, बीज भांडवल योजना तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक विकासासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.