

महानगर गॅसच्या नावाने फसवे मेसेज
दररोज सरासरी दोन गुन्हे नोंद; ‘गॅस बंद’ची भीती दाखवून लाखोंची लूट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : इराण युद्धामुळे घरगुती आणि व्यावसायिक वापराचा गॅसपुरवठा विस्कळित झाल्याची संधी साधून सायबर भामट्यांनी महानगर गॅस कंपनीचे नाव वापरून फसवणुकीचे प्रयत्न अधिक आक्रमकपणे सुरू केले आहेत. विशेष म्हणजे गॅसपुरवठा सुरळीत होईल की तुटवडा निर्माण होईल, याबाबत साशंक असलेले नागरिक या प्रयत्नांना सहज बळी पडत आहेत. मार्च महिन्यात दिवसाला सरासरी दोन गुन्हे शहराच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महानगर गॅस कंपनीच्या नावे याआधीही फसवे मेसेज येत होते. फसवणूकही सुरू होती. मात्र गॅस सिलिंडर पुरवठा विस्कळित झाल्यावर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असून, त्यावर उपाय म्हणून शासनाने व्यावसायिक वापराच्या पुरवठ्यावर निर्बंध लादले. त्यामुळे संपूर्णपणे गॅसवर अवलंबून असलेली अनेक हॉटेल, खाणावळी आणि रस्त्यावर चहापासून जेवणापर्यंत अन्नपदार्थ शिजवून विकणारे हजारो धंदे बंद पडले आहेत. घरगुती वापराच्या दोन गॅस सिलिंडर वितरणामध्ये तीन ते चार आठवड्यांचे अंतर ठरवून देण्यात आले.
मुंबई सोडल्यास महानगर प्रदेशातील ग्रामीण भागात घरगुती गॅस तुटवड्यामुळे नागरिकांचे हाल अधिक होताना दिसत आहेत. आसपास असलेल्या या परिस्थितीमुळे महानगर कंपनीची गॅस वाहिनी असलेले ग्राहकही धास्तावलेले आहेत. त्यामुळेच महानगर गॅस कंपनीच्या नावे आलेल्या फसव्या मेसेजला अधिकाधिक ग्राहक बळी पडत आहेत.
पाण्यानंतर गॅस हा नागरिकांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे. हे भामट्यांना अवगत असून, ते या युद्धकाळातील अस्थिरतेचा फायदा घेत आहेत. विषय जिव्हाळ्याचा असल्याने गॅसपुरवठा खंडित होणार, अशी भीती घातल्यावर कसलाही विचार न करता फसवी लिंक उघडणारा त्यात तपशील भरणार याचाही अंदाज भामट्यांना आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
व्यावसायिक, पत्नीच्या खात्यातून ११ लाख वळते
स्टील व्यापारी मितुल दोषी यांना २६ मार्चला अनोळखी क्रमांकावरून महानगर गॅस कंपनीच्या नावे मेसेज आला. त्यात थकलेले बिल तत्काळ न भरल्यास रात्रीपर्यंत गॅसपुरवठा खंडित होईल, असे नमूद होते. दोषी यांनी लगोलग बिल भरले. मात्र संध्याकाळी त्यांना त्याच क्रमांकावरून बिल कधी भरणार, असे विचारणारा कॉल आला. बिल भरल्याचे सांगताच समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने सिस्टीममध्ये अपडेट न झाल्याने बिल बाकी असल्याचे दर्शवित आहे, असे सांगत दोषी यांना एक लिंक पाठवली. ती एपिके फाईल होती. त्यावर सर्व तपशील भरा, असे सांगण्यात आले. त्यानुसार तपशील भारताच दोषी आणि पत्नीच्या खात्यातून ११ लाख रुपये परस्पर वळते झाले.
फसवणूक कशी टाळाल?
सर्वसाधारणपणे महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून ग्राहकांना येणारे सर्व प्रकारचे मेसेज एक्स-एमजीएलएलटीडी या नावे प्राप्त होतात. उदाहरणार्थ गॅस मीटरचे रीडिंग घेण्यासाठी अमुक नावाचा अधिकारी तमुक वेळी येईल, या महिन्याचे गॅस बिल इतके असून, या तारखेआधी ते भरावे. मात्र भामट्यांकडून येणारे फसवे मेसेज खासगी नंबरवरून प्राप्त होतात किंवा खासगी मोबाईल क्रमांकावरून कॉल करून भामटे स्वतःला महानगर गॅस कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवतात. अशा मेसेज आणि कॉलकडे दुर्लक्ष करावे. मेसेजमधील लिंक उघडू नये, त्यात तपशील भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.