

पथविक्रेता समितीची मतमोजणी पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : महापालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेता (फेरीवाला) समिती निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज (ता. २९) शांततेत पूर्ण झाली. २०२४ मध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक निवडणुकीची मतमोजणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारपासून सुरू होती. या प्रक्रियेनंतर निवडून आलेल्या सदस्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असली, तरी अंतिम निकाल कायदेशीर प्रक्रियेनंतरच अधिकृतपणे सार्वजनिक केला जाणार आहे.
महापालिका मुख्यालयात ही मतमोजणी पार पडली. सुमारे २५० कर्मचाऱ्यांनी रात्रभर चाललेल्या या प्रक्रियेत सहभाग घेतला. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आरक्षणनिहाय मतपत्रिकांची विभागणी करून अत्यंत पारदर्शकपणे ही मोजणी पूर्ण करण्यात आली. या वेळी उपायुक्त (विशेष) विनायक विसपुते, अनुज्ञापन अधीक्षक अनिल काटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतमोजणी करून विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत; मात्र हा निकाल सर्वप्रथम न्यायालयासमोर सादर केला जाईल. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच तो सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील फेरीवाल्यांचे धोरण निश्चित करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या या मतदानात सरासरी ४९.४६ टक्के मतदान झाले होते. आता मतमोजणी पूर्ण झाल्याने फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीतील एक मोठा टप्पा पार पडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.