जुन्या नाण्यांचे लाखो रुपये देण्याच्या आमिषावर वृद्धेची फसवणूक

जुन्या नाण्यांचे लाखो रुपये देण्याच्या आमिषावर वृद्धेची फसवणूक
Published on

जुन्या नाण्यांचे लाखो रुपये देण्याच्या प्रलोभनातून वृद्धेची फसवणूक
६० लाख देऊ सांगत १९ लाख रुपये उकळले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः चलनातून बाद झालेली जुनी नाणी मोठ्या किमतीला विकत घेण्याचे प्रलोभन आणि आयकर विभागाच्या कारवाईची भीती घालत भामट्यांनी चुनाभट्टी परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धेकडून १९ लाख रुपये उकळले.
मे २०२५ ते यावर्षी जानेवारी महिन्यापर्यंत घडलेल्या या फसवणूक प्रकरणाचा तपास चुनाभट्टी पोलिसांनी अलीकडेच गुन्हा नोंदवून सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेचे नाव गौरी शंभू असे आहे. गौरी यांच्या सासूला जुनी चलनी नाणी गोळा करण्याचा छंद होता. २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मुलाने (गौरी यांचे पती) ती नाणी आईची आठवण म्हणून सांभाळून ठेवली.
दरम्यान, समाजमाध्यम चाळताना ओल्ड कॉइन नावाच्या कंपनीने केलेली जाहिरात गौरी यांना दिसली. या जाहिरातीत चलनातून बाद झालेली जुनी चलनी नाणी दुर्मिळ असून, त्याबदल्यात कंपनी मोठा परतावा देईल, असे नमूद होते. गौरी यांनी तातडीने जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. समोरून अनिल कुमार या व्यक्तीने कंपनीचा अधिकारी म्हणून संवाद साधला. त्याने जुन्या नाण्यांचा फोटो मागितला. तो गौरी यांनी पाठवला. तेव्हा अनिल असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने या नाण्यांचे ६० लाख रुपये देऊ, असे सांगितले.
गौरी यांना ओल्ड कॉइन ही खरेच जुनी नाणी विकत घेणारी कंपनी आहे यावर विश्वास बसला. त्यांनी लगेचच या व्यवहाराला होकार दिला. मात्र, नोंदणी, नाण्यांची खरी किंमत काढणे, कर आदी निमित्त करून गौरी यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. ६० लाख मिळणार या विचाराने हुरळून गेलेल्या गौरी ही रक्कम देत गेल्या. त्यांनी जानेवारी महिन्यापर्यंत १९ लाख रुपये उकळले.
त्यानंतरही व्यवहार होत नाही म्हणून गौरी यांनी आसपास चौकशी केली तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पुन्हा अनिल नावाच्या व्यक्तीला आणि जाहिरातीतील नमूद अन्य क्रमांकावर त्यांनी संपर्क साधून पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनिल नावाच्या व्यक्तीने आयकर विभागाला सांगून खोट्या प्रकरणात अडकण्याची धमकी देऊ लागला. तसेच आणखी पैशांची मागणी करू लागला. तेव्हा गौरी यांनी चुनाभट्टी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com