

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर वैद्यकीय कक्ष
प्रवाशांना तातडीची मदत; रेल्वेला वार्षिक ४० लाख महसूल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई उपनगरी रेल्वेमार्गावरील प्रवाशांची वाढती संख्या आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रवाशांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी १० स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयाबाबत माहिती अधिकारातून समजले आहे.
सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर केवळ चार स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध आहे. लवकरच आणखी १० स्थानकांवर हे कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. अचानक प्रकृती बिघडणे, चक्कर येणे, अपघात होणे किंवा रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने उपचार मिळणे शक्य हाेणार आहे. या वैद्यकीय कक्षांसाठी खासगी संस्थांना परवाने देण्यात आले आहेत. या परवान्यांतून मध्य रेल्वेला दरवर्षी सुमारे ४० लाख रुपयांचा महसूल मिळणार असून, प्रवाशांची सुविधा आणि रेल्वेचा उत्पन्न स्रोत असा दुहेरी फायदा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या स्थानकांवर सुविधा
टिटवाळा, कुर्ला, कर्जत, कळवा, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, मुंब्रा, ठाणे, घाटकोपर आणि चेंबूर या स्थानकांवर हे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. या कक्षांसाठी २०३०पर्यंत परवाने देण्यात आले आहेत.
‘गोल्डन अवर’मध्ये मदत
अपघातानंतरचा पहिला एक तास हा ‘गोल्डन अवर’ मानला जातो. या कालावधीत योग्य उपचार मिळाल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. स्थानकांवरच वैद्यकीय कक्ष उपलब्ध झाल्याने जखमी प्रवाशांना तातडीची मदत मिळून मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
-----------------
काेट
मुंबई उपनगरी रेल्वेच्या स्थानकांवरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. ही सुविधा गर्दीच्या सर्व स्थानकांवर टप्प्याटप्प्याने सुरू करावी. या कक्षांत प्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे असणे गरजेचे आहे.
- समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.