

महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
भूषण गगराणी यांच्याकडून स्वीकारला पदभार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : महापालिकेच्या आयुक्तपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मंगळवारी (ता. ३१) नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे आज सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांच्या रिक्त जागी भिडे यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पदाची सूत्रे आता एका अनुभवी महिला अधिकाऱ्याच्या हाती आली आहेत. त्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. भिडे यांनी मंगळवारी दुपारी मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पदभार स्वीकारला.
अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अप्पर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीसोबतच शासनाने त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्याही सोपवल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत त्या मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचादेखील अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. मेट्रो-३ सह मुंबईतील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव असल्याने, महापालिका आयुक्त म्हणून काम करताना याचा शहराला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भिडे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्री कार्यालयातील अप्पर मुख्य सचिव पदावर लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रा हे सध्या महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. भिडे यांनी आपल्याकडील अपर मुख्य सचिव (खनिकर्म) या पदाचा कार्यभारही लोकेश चंद्रा यांच्याकडे सोपवून आजच महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारावा, असे निर्देश सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी दिले आहेत.
नियुक्तीला राजकीय महत्त्व
अश्विनी भिडे यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तसेच मेट्रो रेल्वे प्रकल्पातील त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांची ओळख एक ‘रिझल्ट ओरिएंटेड’ अधिकारी म्हणून आहे. मुंबईतील कोस्टल रोड, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीला मोठे राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.