

१२ वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढला केसांचा गोळा
तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर; तपासणीत निघाला ‘ट्रायकोबेझोअर’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : एका १२ वर्षांच्या मुलीच्या पोटातून सुमारे १६ x १४ सेंटीमीटर आकाराचा केसांचा मोठा गोळा यशस्वीरीत्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पोटाच्या वरच्या भागात छेद घेऊन करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे मुलीची प्रकृती स्थिर झाली आहे.
सुमारे दीड महिन्यापासून मुलीला जेवणानंतर पोट भरल्यासारखे वाटणे, भूक न लागणे आणि वारंवार उलट्या होणे अशी लक्षणे दिसत होती. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या तक्रारी हळूहळू वाढत गेल्यानंतर कुटुंबीयांनी वैद्यकीय सल्ला घेतला. तपासणीत पोटात मोठी गाठ आढळून आली. सीटी स्कॅन आणि एंडोस्कोपीदरम्यान पोटाच्या सुमारे ९० टक्के भाग व्यापणारा केसांचा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला एंडोस्कोपीद्वारे तो काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गोळ्याचा मोठा आकार आणि घट्टपणा लक्षात घेता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोट उघडून सुमारे १६ x १४ सेंटीमीटर आकाराचा केसांचा गोळा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. केस, अन्नकण आणि म्युकसपासून तयार झालेला हा गोळा ‘ट्रायकोबेझोअर’ असल्याचे प्रयोगशाळा तपासणीत निष्पन्न झाले. सुदैवाने, त्यात कोणतीही कर्करोगाची लक्षणे आढळली नाहीत. संपूर्ण प्रक्रिया सुमारे तीन तासांत पूर्ण झाली. सात दिवसांत तिला घरी सोडण्यात आले.
डॉक्टरांच्या मते, मानवी केस पचत नसल्यामुळे ते दीर्घकाळ पोटात साचून अशा प्रकारचा गोळा तयार होऊ शकतो. ही समस्या अनेकदा ‘ट्रायकोटिलोमेनिया’ (केस उपटण्याची सवय) आणि ‘ट्रायकोफॅजिया’ (केस खाण्याची सवय) यांसारख्या मानसिक अवस्थांशी संबंधित असते.
वेळेत निदान आवश्यक
या पार्श्वभूमीवर, संबंधित मुलीला मानसिक समुपदेशन देण्यात आले असून, भविष्यात अशी समस्या टाळण्यासाठी उपचार सुरू करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, मुलांमध्ये सतत पोटदुखी, उलट्या किंवा भूक मंदावणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत निदान करणे अत्यंत गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.