

वाढत्या उन्हामुळे सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत
वन्यजीव संस्थांकडून सतर्कतेचा इशारा; मदतीसाठी हेल्पलाइन कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून, या तीव्र उष्णतेचा फटका आता वन्यजीवांनाही बसू लागला आहे. नैसर्गिक जलस्रोत आटल्याने आणि जमिनीतील उष्णता असह्य झाल्याने साप, सरडे आणि कासव यांसारखे सरपटणारे प्राणी थंडाव्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत.
अशा परिस्थितीत नागरिकांनी न घाबरता सतर्क राहावे आणि प्राण्यांना इजा न करता वन्यजीव संस्थांशी संपर्क साधावा, असे आवाहन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल प्रोटेक्शन, अम्मा केअर फाउंडेशन आणि पॉज-मुंबई यांनी संयुक्तपणे केले आहे.
वाढत्या उन्हामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांना निर्जलीकरण आणि उष्णतेच्या ताणाचा मोठा त्रास होत आहे. परिणामी हे प्राणी सुरक्षित आणि थंड ठिकाणच्या शोधात निवासी भाग, इमारतींचे पार्किंग, बागा आणि कधीकधी घरांच्या आतही आश्रय घेत आहेत. विशेषतः कासवं पाण्याचा शोध घेत असताना रस्ते ओलांडताना आढळत आहेत.
यासंदर्भात मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन यांनी सांगितले की, साप आणि इतर सरपटणारे प्राणी निसर्गचक्राचा अविभाज्य भाग आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार त्यांना संरक्षण देण्यात आले असून, त्यांना मारणे किंवा त्रास देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी अशा वेळी स्वतःहून प्राण्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये.
ओआयपीएच्या प्रतिनिधी निशा कुंजु यांनी नागरिकांना काही प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहेत. घराच्या आसपासच्या भेगा व फटी बंद कराव्यात, परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा किंवा लाकडाचे ढिगारे साचू देऊ नयेत. विशेषतः बाहेर ठेवलेली पादत्राणे वापरण्यापूर्वी नीट तपासावीत. घरात किंवा परिसरात साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखून ठेवावे आणि त्वरित तज्ज्ञांना पाचारण करावे.
येथे साधा संपर्क
कोणताही वन्यजीव संकटात आढळल्यास नागरिकांनी वन विभागाच्या १९२६ या क्रमांकावर किंवा ९८३३४८०३८८ या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.