

‘गारगाई’ प्रकल्पाला गती
सल्लागार नियुक्तीसाठी पालिकेकडून निविदा प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईच्या भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिकेने महत्त्वाकांक्षी गारगाई धरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत धरण बांधणे, बोगदा तयार करणे आणि इतर तांत्रिक कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठीची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गारगाई प्रकल्प हा मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील एक मैलाचा दगड मानला जात आहे. पालघर जिल्ह्यातील गारगाई नदीवर हे धरण उभारले जाणार आहे. यामध्ये धरणात साठवलेले पाणी मोडक सागर जलाशयापर्यंत वाहून नेण्यासाठी अवाढव्य बोगद्याचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला दररोज अतिरिक्त ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे नियोजन, आराखड्याची पडताळणी, बांधकामावर देखरेख आणि गुणवत्तेची खात्री करण्यासाठी महापालिकेला तज्ज्ञ सल्लागाराची आवश्यकता आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. धरण बांधकाम, बोगदा आणि संबंधित सर्व कामांचे व्यवस्थापन व पर्यवेक्षण या कामांचा यात समावेश आहे. इच्छुक कंपन्यांना आपली निविदा सादर करण्यासाठी २७ एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आली आहे. हा प्रकल्प अभयारण्य क्षेत्रात येत असल्याने, पर्यावरण नियमांचे काटेकोर पालन करत काम पूर्ण करण्याचे आव्हान सल्लागार कंपनीसमोर असेल.
मुंबईकरांना दिलासा
मुंबईची लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण पाहता सध्याचे पाणीपुरवठा स्रोत अपुरे पडण्याची चिन्हे आहेत. गारगाई धरण पूर्ण झाल्यास मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटातून मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या विविध पर्यावरणीय परवानग्या आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियेवरही पालिका प्रशासन समांतरपणे काम करत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळण्याची चिन्हे असून, महापालिका प्रशासनाने हा प्रकल्प प्राधान्यक्रमावर घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.