

काँग्रेस करणार जिल्हा पातळीवर पुनर्रचना
लवकरच होणार साडेसात हजार नियुक्त्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : राज्यातील काँग्रेस पक्षाने आता कात टाकणे सुरू केले असून राज्यात जिल्हा पातळीवर संघटनेची पुनर्रचना व नवनिर्माण करण्याच्या प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. पक्षातर्फे राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेस नव्या अध्यक्षांचा शोध सुरू झाला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या संकल्पनेनुसार देशात पहिल्यांदाच या अभियानांतर्गत तालुका पातळीवरील अध्यक्षांचाही शोध घेतला जात आहे. या अभियानानंतर राज्यात काँग्रेस संघटनेत जिल्हा व तालुका पातळीवर मिळून साडेसात हजार नियुक्त्या केल्या जाणार असून यात तरुणाईला व विविध सामाजिक घटकांना प्राधान्याने संधी मिळणार आहे.
मध्यंतरी काँग्रेसने टॅलेंट हंट स्पर्धा घेतली व त्याला राज्यभर शेकडो लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेतून जिल्हा व राज्य पातळीवर प्रवक्ते, संशोधन व सोशल मीडिया समन्वयक नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर आता राज्यात संघटन सृजन अभियान राबविले जात असून काँग्रेस संघटनेतील ७२ जिल्ह्यांसाठी अध्यक्षांच्या नावांची शिफारस या अभियानाच्या अखेरीस अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक करणार आहेत. काँग्रेसने नेमलेले ३७ निरीक्षक हे विविध जिल्ह्यात जाऊन जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा काँग्रेससाठी अध्यक्षांच्या किमान तीन ते सहा नावांची शिफारस करणार आहेत. या नावांमधून नवी दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार आहेत.
--
तालुका काँग्रेससाठी सपकाळ पॅटर्न
संघटन सृजन अभियानात देशात पहिल्यांदाच या अभियानात तालुकाध्यक्ष व तालुका पातळीवरील महिला, युवक, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींसह १० आघाड्यांसाठीच्या अध्यक्षपदांसाठी नेत्यांचा शोध घेतला जात आहे. अ. भा. निरीक्षकांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन प्रदेश निरीक्षक नेमण्यात आले असून त्यांच्यावर तालुका पातळीवरील ११ पदांसाठी नावे सुचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सपकाळ यांनी बदलत्या काळातील लोकसंख्या आणि काँग्रेसला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन राज्यात जिल्ह्यांची संख्या १२ने वाढवली तर तालुक्यांची संख्या १२२ने वाढवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात ३२ तर कोकणात २६ तालुक्यांसह राज्यात ६७५ तालुके असून या प्रत्येक तालुक्यात ११ अध्यक्षांची पदे लवकरच भरली जाणार आहेत. त्यामुळे केवळ तालुका पातळीवर सात हजारांहून अधिक जणांना पक्षात नेतृत्वाची संधी लाभणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.