

रुग्णालयातील १३ लॅब तंत्रज्ञांच्या पात्रतेवर प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील १३ लॅब तंत्रज्ञांच्या पात्रतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली असून, आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. त्याद्वारे २८ एप्रिलला प्रत्यक्ष किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
रुग्णालयातील १३ लॅब तंत्रज्ञ आवश्यक नोंदणीशिवाय काम करीत असल्याची तक्रार आहे. महाराष्ट्र परिचारिका आणि पारावैद्यक व्यावसायिक (पॅरामेडिकल) परिषद अधिनियम, २०११ नुसार अशा कर्मचाऱ्यांची नोंदणी अनिवार्य आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आल्याचा दावा तक्रारदार ॲड. तुषार भोसले यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी यापूर्वी रुग्णालय प्रशासन तसेच महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे पाठपुरावा केला होता. कौन्सिलच्या निबंधकांनीही नोंदणी बंधनकारक असल्याचे पालिका आयुक्तांना कळवले होते. या प्रकरणात ठोस प्रशासकीय किंवा फौजदारी कारवाई न झाल्याने अखेर मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे.
आयोगाच्या सदस्या न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी पालिका आयुक्तांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. २८ एप्रिलला सकाळी ११ वाजता आयोगाच्या कोर्ट क्रमांक २मध्ये उपस्थित राहून लेखी उत्तर सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित कागदपत्रे आणि चौकशी अहवालाच्या दोन प्रती सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.