लघुउद्याेगांतील ५० लाख कामगार बेराेजगार

लघुउद्याेगांतील ५० लाख कामगार बेराेजगार
Published on

युद्धाची झळ : लाेगाे


लघुउद्याेगांतील ५० लाख कामगार बेराेजगार

उत्पादन खर्चात वाढ अन्‌ निर्यात ठप्प

नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पश्‍चिम आशियातील युद्धाने महाराष्ट्राच्या लघु व मध्यम उद्योगांचे आर्थिक कंबरडे माेडले आहे. कच्च्या तेलाच्या किमती वधारल्यामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच हाेर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गातील अडथळ्यांमुळे निर्यात ठप्प झाली असून, लघुउद्याेग आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यभरातील ५० लाख कंत्राटी कामगारांवर बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळली आहे.

राज्यातील लघु आणि मध्यम उद्याेगांसाठी पश्‍चिम आशियासह आखाती देश महत्त्वाची बाजारपेठ आहे. द्राक्षे, केळी यांसारख्या कृषी उत्पादनांसह अभियांत्रिकी वस्तू आणि वस्त्रोद्योगातील उत्पादने माेठ्या प्रमाणात निर्यात केली जातात. इराण युद्धामुळे या देशांतील मागणी आणि वाहतूक विस्कळित झाली असून, रमजानमधील व्‍यवसायाची माेठी संधी गमवावी लागली आहे. ग्लास इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग युनिट, फॅब्रिकेशन यांसह गॅसवर अवलंबून असलेले उद्योग अडचणीत आहेत.

हाेर्मुझ सामुद्रधुनी प्रभावित झाल्यामुळे अनेक कंटेनर हे बंदरे व ट्रान्सशिपमेंट हब येथे अडकले आहेत. त्यामुळे ऑर्डर रद्द होणे, उशिरा डिलिव्हरीसाठी दंड यांसारख्या नुकसानाबराेबरच व्यवसायातील विश्वासार्हतेचीही प्रचंड हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने धाेरणात्मक मदत आणि हस्तक्षेप करावा, अशी मागणी उद्याेजकांकडून केली जात आहे.

वाहतूक व विमा खर्चात वाढ
युद्धजन्य जोखमीमुळे विमा प्रीमियममध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच मार्गातील बदल आणि सुरक्षेच्या कारणांमुळे खर्च वाढला आहे. आधीच कमी मार्जिनवर काम करणारे छोटे निर्यातदार जागतिक स्पर्धेत मागे पडत आहेत.
-------------
पुरवठा साखळीत अडथळे
रसायने, प्लास्टिक, खते आणि एलपीजी यांसारख्या महत्त्वाच्या घटकांच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. आयातीवर अवलंबून असलेल्या उत्पादन युनिटना तुटवडा जाणवत असून, उत्पादनात विलंब आणि क्षमता कमी होत आहे.
==
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे कृषी निर्यातदार, वस्त्रोद्योग, वाहनांचे सुटे भाग, रसायन व औषध उद्योग, अभियांत्रिकी या क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे. युद्धसंकटामुळे खर्चात वाढ हाेऊन आथिक अडचणीत सापडलेल्या लघु व मध्यम उद्याेगांना तातडीने धोरणात्मक मदत आणि हस्तक्षेप आवश्यक आहे.
- डॉ. मिलिंद कांबळे,
संस्थापक अध्यक्ष, डिक्की
==
पश्‍चिम आशियातील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा आहे. गॅसअभावी या उद्याेगांतील काम ठप्प पडल्यामुळे राज्यात ५० लाख कंत्राटी कामगार बेरोजगार झाले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी सहा महिने व्याजमाफी आणि बिनव्‍याजी २५ टक्के अतिरिक्त कर्ज देण्यात यावे.
- चंद्रकांत साळुंखे, अध्यक्ष, महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com