

मिठी नदीवर आतापर्यंत एका धरणाचा खर्च
कोट्यवधींचा चुराडा करूनही भय कायम
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मिठी नदीच्या महापुरानंतर २००५ पासून आतापर्यंत सुमारे ४,००० कोटी रुपये मिठी नदीवर खर्च झाले आहेत. या पैशात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी एखादा पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण झाला असता. मात्र कोट्यवधी रुपये खर्च करूही मिठीचे भय अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे मुंबईकरांना पैशाचा अपव्यय होत असल्याबद्दल चिंता वाटत आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००५च्या पुराच्या पार्श्वभूमीवर मिठी नदीच्या संरक्षणासाठी १,२०० कोटी रुपये निधीची मंजुरी दिली होती. या निधीचा उद्देश नदीची रुंदी वाढवणे, खोलीकरण करणे आणि संरक्षक भिंती बांधणे, गार्डनिंग, बोटिंग हा होता, महापुराचा धोका पुन्हा उद्भवू नये, यासाठी विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोडच्या जवळ एक मोठा हाउस बांधण्यात येणार होता. त्यात नदीला येणाऱ्या भरतीचे पाणी सोडण्यात येणार होते, जेणेकरून भविष्यात मुंबईला पुरापासून वाचवता येईल. या कामांच्या अंमलबजावणीबाबत कालांतराने प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिठी नदीचे पुनरुज्जीवन आणि गाळ काढण्यासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चात पालिकेचा एक पाणीपुरवठा प्रकल्प तयार झाला असता आणि मुंबईकरांची तहान भागवता आली असती. मात्र, मिठी नदीवर झालेल्या कोट्यावधी रुपये खर्चातून रुंदीकरण, खोलीकरण, पुनरुज्जीवन झाले नाही, मिठीच्या विकासाची कामे ढेपाळली असल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबईकरांमध्ये मिठीचे भय कायम आहे. कराच्या रूपाने आलेल्या पैशाचा अपव्यय होत असल्याबद्दल संतापाची भावना आहे.
आतापर्यंत झालेला खर्च
- मिठी नदीच्या विविध कामासाठी १,२०० कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळाले
- गाळ काढणे आणि विकासासाठी १० वर्षांत सुमारे २,५०० कोटी रुपये खर्च झाले
२०१६-२०२० (विशेष प्रकल्प)
५६९ कोटी रुपये- नदी सुधारणा योजना
५० कोटी रुपये-आधुनिक यंत्रसामग्री
- तिसऱ्या टप्प्यातील ३,००० कोटी रुपयांचा प्रकल्प कंत्राटदार मिळत नसल्यामुळे रखडला आहे.
मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी, नदीकाठच्या राहिवाशांच्या स्थलांतराची शिवसेनेने चांगले काम केले. मात्र, चार वर्षांच्या काळात मिठी नदीत आठ फूट गाळ साचलाय. शिवसेनेची सत्ता असताना घेतलेली यंत्रसामग्री धूळ खात पडली. चार वर्षांत मिठीची वाट लावली.
- किशोरी पेडणेकर,
विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका
मिठी नदीच्या कामाचे ऑडिट केले पाहिजे. याप्रकरणी काही तुरुंगात गेले, काहींवर केसेस सुरू आहेत. मिठीबाबत महापौर आणि आयुक्तांनी मिळून दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात आणि कामाबाबत पारदर्शकता हवी, असे माझे मत आहे.
रवी राजा, उपाध्यक्ष, भाजप, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.