

मध्य रेल्वेचा दंडवसुलीत विक्रम
विशेष मोहिमेत २४ टीसी ‘करोडपती; महसुलात २३ टक्के वाढ!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : उपनगरी रेल्वेमार्गांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवाशांमध्ये नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवत दंडवसुलीत मोठी वाढ केली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४१.८२ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यातून २५१.४२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापूर्वी २०२४-२५ मध्ये ३८.०५ लाख प्रवाशांकडून २०३.७० कोटी रुपयांची दंडवसुली झाली होती. त्यामुळे दंडवसुलीत २३ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कठोर तपासणी मोहिमेमुळे २४ तिकीट तपासनीसांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्याची कामगिरी केली आहे. यात मुख्यालयातील १०, भुसावळ विभागातील १०, मुंबई विभागातील तीन आणि पुणे विभागातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.
टीसींची विक्रमी कामगिरी
भुसावळ विभागातील प्रवासी तिकीट परीक्षक निसार खान यांनी सर्वाधिक १.४८ कोटी रुपयांची दंडवसुली करून प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यालयातील मुख्य तिकीट निरीक्षक एम. एम. शिंदे यांनी सलग दुसऱ्या वर्षी एक कोटींचा टप्पा पार करत यंदा १.४६ कोटी रुपयांची वसुली केली. तसेच संतोष कुमार गुप्ता, सुभाष गलांडे, दीपक दहातोंडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी कोटींची वसुली केली. दरम्यान, विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी विशेष तपासणी पथके, अचानक तपासण्या आणि जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.