संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार; सहा आरोपींना अटक,

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार; सहा आरोपींना अटक,
Published on

बिबट्यांची शिकार;
सहा आरोपींना अटक

​मुंबई, ता. ७ : मुंबईचे फुप्फुस मानल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गाभा क्षेत्रात बिबट्यांची शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डहाणू वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बिबट्याच्या कातडीसह दोघांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान या शिकारीचे धागेदोरे थेट राष्ट्रीय उद्यानातील येऊर आणि चेना पश्चिम क्षेत्रापर्यंत पोहोचले. आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
​डहाणू वनविभागाच्या भाताणे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना २९ मार्चला रंगेहाथ पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी ही शिकार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर विभागात केल्याची कबुली दिली. त्यानंतर येऊर वनपरिक्षेत्राच्या पथकाने फरार असलेल्या अन्य चार आरोपींना अटक केली. यातील मुख्य आरोपी हे उद्यानातील ‘माशाचा पाडा’ येथील अतिक्रमक आहेत.
​आरोपींनी दिलेल्या कबुलीत तीन बिबट्यांचे शव मिळाल्याचे आणि त्यांचे दात व इतर अवयव काढून घेतल्याचे मान्य केले आहे. ३ एप्रिलला केलेल्या पंचनाम्यात बिबट्याची हाडे, तारेचे फास आणि शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले. चेना पश्चिम आणि काशीजवळील क्षेत्रात दोन बिबट्यांची शिकार झाल्याचे निश्चित झाले असून, घोडबंदर परिसरात मिळालेले अवशेष त्याच बिबट्यांचे आहेत की तिसऱ्या कोणाचे, याचा तपास सुरू आहे. या शिकारी साधारण पाच ते सहा महिन्यांपूर्वी, म्हणजेच गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या सुमारास झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ​अटक केलेल्या सहा आरोपींपैकी विशाल वरठा, मयूर म्हात्रे, अनिल धावडे, हर्षद जाधव, दिनेश पागेरा आणि संतोष घोशे यांचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपींनी वनहक्क कायद्यांतर्गत जमिनीवर दावे दाखल केले आहेत. पूर्वी वनमजूर म्हणून काम केल्यामुळे त्यांना जंगलातील दुर्गम भागांची पूर्ण माहिती होती. याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी गाभा क्षेत्रात घुसखोरी करून फासे लावून बिबट्यांची शिकार केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
​वसई न्यायालयाने ६ एप्रिलला मयूर म्हात्रे याला जामीन मंजूर केला, तर उर्वरित पाच आरोपींची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. येऊर वनविभागाने या आरोपींचा ताबा घेण्यासाठी मिरा-भाईंदर न्यायालयात ‘प्रोडक्शन वॉरंट’साठी अर्ज केला आहे. मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि संचालक अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक प्रदीप पाटील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com