

मुंबई, ठाण्यासह एमएमआरमधील
अतिरिक्त विजेची चिंता मिटणार
- महापारेषणची बाभळेश्वर-कुडूस ४०० के. व्ही. वीजवाहिनी कार्यान्वित
- ३,००० मेगावॉट वीज एमएमआर क्षेत्रात आणता येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई, ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अतिरिक्त विजेची चिंता आता मिटणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर ते भिवंडीनजीक असलेल्या कुडूसदरम्यान ४०० के. व्ही.ची २२८ किलोमीटर लांबीची वीजवाहिनी उभारली आहे. ती आज कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातून मुंबईसह एमएमआर क्षेत्रात अतिरिक्त ३,००० मेगावॉट वीज आणणे शक्य होणार आहे.
मुंबईसह परिसरातील विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. सदर विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यभरात असलेल्या वीजनिर्मिती केंद्रातून सहजपणे मुंबईत जास्तीत जास्त वीज वाहून आणता यावी म्हणून २०१० मध्ये महापारेषणने बाभळेश्वर-कुडूस यादरम्यान ४०० के. व्ही.ची वीजवाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाची अंमलबजावणी मेसर्स कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आली. सुरुवातीला २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प विविध अडचणींमुळे लांबला होता. मात्र, हा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली आहे. याचा मुंबईबरोबरच ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याचे महापारेषणने स्पष्ट केले आहे.
-----
७१५ मनोरे, २२८ किलोमीटरची लांबी
या प्रकल्पांतर्गत एकूण ७१५ मनोरे उभारण्यात आले असून, द्विपथ वाहिनीची लांबी सुमारे २२८ किमी आहे. यापैकी नाशिक विभागात ४८५ मनोरे उभारणी आणि ३०४ सर्किट किमी तारा ओढण्याचे काम, तर वाशी विभागात २३० मनोरे उभारणी आणि १५२ सर्किट किमी तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
----
वीज मागणी सुलभ होणार
या वीजवाहिनीमुळे सद्यःस्थितीतील पडघे-बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार आहे, तर प्रणालीची विश्वासार्हता वाढणार आहे. कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध होऊन मुंबई परिसरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता सुलभ होणार आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.