

रेलवनचा ‘स्मार्ट’ गैरवापर
टीसी दिसताच तिकीट; रेल्वे महसूल धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : उपनगरी रेल्वेतील डिजिटल तिकीट प्रणालीला गती देण्यासाठी अनिवार्य केलेल्या ‘रेलवन’ ॲपमधील त्रुटी आता रेल्वेच्या महसुलावरच परिणाम करू लागल्या आहेत. धावत्या लोकलमध्ये तिकीट तपासनीस (टीसी) दिसल्यानंतरच तिकीट काढण्याचा नवा प्रकार वाढला आहे. नियमांना चुकवण्याची ही पद्धत प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.
१ मार्चपासून ‘यूटीएस’ ॲप बंद करून रेलवन सक्तीचे करण्यात आले. मात्र, या ॲपमध्ये ‘जिओ-फेन्सिंग’सारखी तांत्रिक मर्यादा नसल्याने प्रवाशांना प्रवास सुरू झाल्यानंतरही तिकीट काढणे शक्य होत आहे. परिणामी, अनेक प्रवासी टीसी दिसताच तिकीट काढून दंड टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः एसी लोकलमध्ये एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज हालचाल करता येत असल्याने हा प्रकार अधिक वाढला आहे. तिकीट बुकिंगच्या वेळेच्या नोंदींवरून आतापर्यंत किमान पाच घटना समोर आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या अधिक असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे केवळ नियमभंग होत नाही, तर रेल्वेच्या महसुलालाही फटका बसत आहे.
तांत्रिक त्रुटी उघड
मध्य रेल्वेने या त्रुटीबाबत ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (क्रिस) यांना पत्र पाठवले आहे. महिना उलटूनही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नाही. त्यामुळे तिकीट तपासणीदरम्यान प्रवासी आणि टीसी यांच्यात वाद वाढत असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी ‘यूटीएस’ ॲपमध्येही अशाच प्रकारचे गैरप्रकार झाले होते. त्या वेळी क्यूआर कोडचा गैरवापर थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, नव्या ॲपमध्ये पुन्हा तांत्रिक त्रुटी उघड झाल्याने डिजिटल तिकीट प्रणालीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.