

साखळी बॉम्बस्फोटातील
दोन आरोपींना जामीन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : प्रदीर्घ तुरुंगवास आणि खटल्याला होणारा विलंब या कारणास्तव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील, सुमारे १५ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी (ता. १०) विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी आरोपी नकी अहमद शेख आणि हारून नाईक यांचा जामीन अर्ज मंजूर केला. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या ‘वैयक्तिक जामीनपत्र’ आणि तितक्याच रकमेच्या हमीवर जामीन मंजूर केला.
आरोपींच्या ‘जलद खटल्याच्या अधिकाराचा’ विचार कनिष्ठ न्यायालयाने केवळ कायद्याच्या कागदापुरता मर्यादित न ठेवता, त्यामागील ‘मूळ उद्देशा’चा विचार करून करणे आवश्यक आहे. संविधानातील तरतुदींचा विचार केवळ घटनात्मक न्यायालयांनीच नव्हे, तर कनिष्ठ न्यायालयांनीही करणे आवश्यक असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने दोन्ही अर्जदारांना ‘समानतेच्या तत्त्वावर’ जामीन मंजूर करताना नोंदवले. तसेच हा जामीन निव्वळ आरोपींच्या दीर्घकाळच्या तुरुंगवासाच्या कारणास्तव मंजूर करीत असून सरकारी पक्षाच्या खटल्याच्या गुणवत्तेबाबत कोणतेही मत व्यक्त करत नसल्याचेही विशेष न्यायाधीशांनी स्पष्ट केले. याशिवाय या प्रकरणातील अन्य सह-आरोपींना उच्च न्यायालयाने याच कारणास्तव यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे.
प्रकरण काय?
मुंबईतील ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर या तीन ठिकाणी एकाच वेळी १३ जुलै २०११ला बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या स्फोटांमध्ये २७ लोकांचा बळी गेला, तर १३० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणातील सुमारे डझनभर आरोपींवर, अटकेनंतर तब्बल आठ वर्षांनी म्हणजेच सप्टेंबर २०१९ मध्ये आरोप निश्चित करण्यात आले. सध्या या खटल्यावर नियमित सुनावणी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.